गौण खनिजांची विनारॉयल्टी वाहतुकदारांवर होणार कारवाई
By Admin | Updated: December 25, 2016 00:27 IST2016-12-25T00:27:43+5:302016-12-25T00:27:43+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : विभागीय कारवाईला जावे लागेल सामोरे

गौण खनिजांची विनारॉयल्टी वाहतुकदारांवर होणार कारवाई
भंडारा : गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार ( रेती ) जड वाहतूक करणारे वाहने व ट्रॅक्टर/ट्रेलर यांच्यावर विभागीय कार्यवाही करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत अवैध गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार (रेती)जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कलम ८६ अंतर्गत विभागीय कारवाई करुन गुन्हा क्र.१ नुसार ३० दिवस परवाना निलंबन तर गुन्हा क्र.२ नुसार ६० दिवसासाठी परवाना निलंबन व गुन्हा क्र.३ नुसार परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ५३ नुसार कारवाई करुन अवैध गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार (रेती) वाहतूक करणाऱ्या परिवहनेत्तर वाहनांवर कारवाई करण्यात येऊन गुन्हा क्र.१ नुसार वाहनाची ३० दिवसाकरीता नोंदणी निलंबन तर गुन्हा क्र.२ नुसार ६० दिवसाची वाहन नोंदणी निलंबन व, गुन्हा क्र.३ नुसार वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येईल.
मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम २१ अंतर्गत अवैध गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार ( रेती ) विना परवाना तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाच्या अनुज्ञप्तीवर कारवाई अंतर्गत गुन्हा क्र.१ नुसार ३० दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन तर गुन्हा क्र.२ नुसार ६० दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलबंन व गुन्हा क्र.३ नुसार ९० दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अवैध गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार (रेती) विना परवाना परिवहन व परिवहनेत्तर तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुध्द पोलीस विभाग तसेच महसूल विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे कळविण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ८६ तसेच कलम ५३ व २१ नुसार कारवाई करतील. रेती वाहतूक करणाऱ्या चालक व मालकांनी आपल्या वाहनातून अवैध विना रॉयल्टी व क्षमतेपेक्षा अधिक भार ( रेती ) विना परवाना मोटार वाहनातून करु नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)