Mini ventilator assistance to Bhandara and Gondia districts | भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना मिनी व्हेंटिलेटरची मदत

भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना मिनी व्हेंटिलेटरची मदत

रुग्णांना सुविधा : सुनील मेंढे यांनी केली होती मागणी

भंडारा : कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अधिक बळ मिळावे, या हेतूने खा. मेंढे यांनी गुरुवारी भंडारा व गोंदिया येथील रुग्णालयांना भेटी देत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याद्वारे पुरविण्यात आलेले मिनी व्हेंटिलेटर भेट दिले.

मागील महिनाभरापासून दोन्ही जिल्ह्यांमध्ये खा. सुनील मेंढे कोरोना नियंत्रणासाठी सातत्याने दौरे करत आहेत. कोरोना महामारीच्या लढ्यात स्वत:ला रुग्णसेवेसाठी झोकून दिले आहे. प्रत्यक्ष रुग्णांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देतात. दोन्ही जिल्ह्यांतील आरोग्य सेवेचा आढावा, औषध, प्राणवायू, बेडची उपलब्धता, अशा अनेक गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.

भंडारा शहरातील डॉ. राजदीप चौधरी यांचे स्पर्श हॉस्पिटल, डॉ. मनोज झंवर यांचे श्लोक हॉस्पिटल व डॉ. अविनाश नान्हे यांचे अशोका कोविड केअर सेंटर व लक्ष्मी सभागृहातील वैनगंगा कोविड सेंटरला व्हेंटिलेटरचा पुरवठा केला. तसेच गोंदिया येथील डॉ. माहुले, डॉ. बजाज यांचे सेंट्रल हॉस्पिटल, अग्रेसन स्मारक समिती कोविड सेंट्रल व डॉ. बहेकार नर्सिंग होम तसेच डॉ. धुर्वे, डॉ.दुबे व डॉ.मेश्राम यांच्या तिरोडा येथील कोविड रुग्णालयाला वेंटिलेटरचे वाटप केले. येथील व केटीएस वैद्यकीय महाविद्यालय रुग्णांची भेट घेऊन व्यवस्थेची पाहणी केली. याबाबत येथील अधिष्ठाता डॉ. तिरपुडे यांच्या सोबत बैठक घेऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. व्हेंटिलेटर व ऑक्सिजनबाबतीत सूचना केल्या. यावेळी आ. विजय रहांगडाले, माजी आ. गोपाल अग्रवाल, भाजपचे गजेंद्र फुंडे उपस्थित होते.

Web Title: Mini ventilator assistance to Bhandara and Gondia districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.