मिनी मंत्रालयातून दोघांचा विधानभवनात प्रवेश
By Admin | Updated: October 20, 2014 23:07 IST2014-10-20T23:07:05+5:302014-10-20T23:07:05+5:30
ग्रामपंचायतीला राजकारणाची प्रथम पायरी म्हणून ओळखल्या जाते तर जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा दर्जा आहे. भंडारा जिल्हा परिषदेत चरण वाघमारे आणि बाळा काशिवार हे विद्यमान सदस्य आहेत.

मिनी मंत्रालयातून दोघांचा विधानभवनात प्रवेश
प्रशांत देसाई - भंडारा
ग्रामपंचायतीला राजकारणाची प्रथम पायरी म्हणून ओळखल्या जाते तर जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा दर्जा आहे. भंडारा जिल्हा परिषदेत चरण वाघमारे आणि बाळा काशिवार हे विद्यमान सदस्य आहेत. या दोघांनाही भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली. त्यात दोघांनीही दणदणीत विजय मिळवून मिनी मंत्रालयातून थेट विधानभवनात प्रवेश केला आहे. दोन जिल्हा परिषद सदस्यांना एकाच वेळी विधानसभेत प्रवेश मिळाल्याचे यावेळी हे राज्यातील पहिले उदाहरण ठरले आहे.
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र आहेत. त्यात भंडारा, तुमसर व साकोली या क्षेत्राचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने तुमसर क्षेत्रातून चरण वाघमारे यांना तर साकोली क्षेत्रातून बाळा काशीवार यांच्यावर पक्षनिष्ठ कामावर विश्वास दर्शवून त्यांना उमेदवारी दिली. यात दोघांनीही पक्षश्रेष्ठीचा विश्वास सार्थ ठरवित तुमसर व साकोली या क्षेत्रातून प्रचंड मताधिक्याने प्रतिस्पर्ध्यावर मात करून विधानभवनात प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताच शिवसेनेसोबत असलेली भाजपाची युती संपुष्ठात आल्यानंतर भाजपकडून योग्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. त्यापूर्वी कोण उमेदवार वरचढ ठरेल, याचे सर्व्हेक्षणही केले. यात तुमसर क्षेत्रात चरण वाघमारे तर साकोली क्षेत्रात राजेश काशीवार यांचे कार्य पक्षश्रेष्ठीच्या लक्षात आले. याशिवाय एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी केलेली पक्षबांधणी, रात्रंदिवस केलेला प्रचार पक्षश्रेष्ठीच्या लक्षात आला. त्यानंतर भाजपने या दोघांना उमेदवारी दिली.
तुमसरचे नवनिर्वाचित आमदार चरण वाघमारे हे मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात तर साकोलीचे नवनिर्वाचित आमदार राजेश काशीवार हे साकोली तालुक्यातील एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात.
या दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याने प्रभावित होऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखविल्याने या क्षेत्रात असलेल्या कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या भरवशावर त्यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली. दिवसागणीक निवडणुकीचे वातावरण तापू लागले होते. बुधवारला मतदान झाले. रविवारला निकाल लागला. यात दोघांनीही पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला. दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मताधिक्याने विजय मिळविला.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात काशीवार व वाघमारे यांचे योगदान महत्वपूर्ण असल्यामुळे मोठ्या फरकाने त्यांना विजय नोंदविता आला. दोघेही जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य असून पहिल्यांदाच लढविलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन दोघांनाही विधानभवनात पोहचता आले. भंडारा जिल्ह्यात यापूर्वी नाना पटोले, सेवक वाघाये, नाना पंचबुद्धे यांचा जिल्हा परिषद ते विधानभवन असा प्रवास आहे. मात्र एकाचवेळी दोन विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आमदार होण्याचा यावेळी हा राज्यातील पहिलाच प्रसंग असावा.
जिल्हा परिषदेत क्षेत्राच्या विकासासाठी झटणारे सदस्य म्हणून या दोघांचीही ओळख आहे. त्यांच्या विजयाने तुमसर व साकोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना त्याच क्षेत्रात विकासाचा झंझावात येण्याची अपेक्षा आहे. भंडाऱ्याचे नवनिर्वाचित आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांनीही अनपेक्षीत यश मिळवून सुखद धक्का दिला.