मिनी मंत्रालय घाणीने बरबटले

By Admin | Updated: January 29, 2015 23:00 IST2015-01-29T23:00:24+5:302015-01-29T23:00:24+5:30

‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान,

Mini ministries have broken down due to dirt | मिनी मंत्रालय घाणीने बरबटले

मिनी मंत्रालय घाणीने बरबटले

छतावर जाळे, भिंतीवर पिचकाऱ्या
भंडारा : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण असे म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद इमारतीत लागलेले विविध पोस्टर, बॅनर, याद्या, येथे विविध कामासाठी येणाऱ्या नागरिक, कर्मचाऱ्यांनी मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे इमारत बेरंग झाली आहे. इमारतीत प्रवेश करताच छतावर जाळे, भिंतीवर पिचकाऱ्या असे दृष्य पाहायला मिळते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी गावागावात धावपळ करीत आहेत. शहरापासून तर खेड्यापर्यंत या अभियानाची जनजागृती सुरू असून परिसर स्वच्छ ठेवण्याचे धडे नागरिकांना दिले जात आहेत. मात्र, जिल्हा परिषद इमारतीतच अभियान राबविण्याचा विसर पडल्याने अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.
जिल्हा परिषद इमारतीत प्रवेश करताच दर्शनी भागावर नोटीस चिपकवलेली दिसून येते. आत गेल्यावर वरच्या माळ्यावर चढताना पायऱ्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. अस्वच्छता दूर करण्यासाठी पायऱ्यांवर टाईल्स लावण्यात आले. मात्र या टाईल्सही पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. स्वच्छतागृहात प्रवेश करताच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या दुर्गंधीचा सामना नागरिकांना व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. मात्र, स्वच्छता करणार कोण, असे म्हणत सर्वच गप्प आहेत. जिल्हा परिषदेत सफाई कर्मचारी आहेत. मात्र, ते नेमकी कुठली स्वच्छता करतात, याचा थांगपत्ता लागत नाही. जिल्हा परिषद इमारतीत फेरफटका मारला असता, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून आले.
कर्मचाऱ्यांच्या वेळा, शासकीय योजनांची माहिती, निवड यादी अशा विविध कागद, पोस्टर्सनी भिंती रंगलेल्या आहेत. अधिकारी सरळ आपल्या कक्षात जाऊन बसतात. त्यांच्या कक्षासमोरील परिसराची नियमित स्वच्छता केली जाते. मात्र, अन्य विभागात गेले तर अस्वच्छता दिसून येते. याचा त्रास कर्मचारी व नागरिकांना सहन करावा लागत आहे.
(नगर प्रतिनिधी)

Web Title: Mini ministries have broken down due to dirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.