लक्षावधीचा रस्ता गेला खड्ड्यात
By Admin | Updated: October 16, 2015 01:06 IST2015-10-16T01:06:25+5:302015-10-16T01:06:25+5:30
बहुप्रतीक्षेनंतर रस्त्याचे बांधकाम सुरू झाले. परंतु झालेल्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने लक्षावधी रूपये खर्चुनही रस्त्याचे हाल झाले आहेत.

लक्षावधीचा रस्ता गेला खड्ड्यात
अपघाताची शक्यता : रेवाबेन पटेल महाविद्यालयासमोरील रस्ता
भंडारा : बहुप्रतीक्षेनंतर रस्त्याचे बांधकाम सुरू झाले. परंतु झालेल्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने लक्षावधी रूपये खर्चुनही रस्त्याचे हाल झाले आहेत. ही स्थिती आहे सिव्हिल लाईन परिसरातील रेवाबेन पटेल महाविद्यालयासमोरील रस्त्याची.
शहरातील सिव्हील लाईन परिसरात मिस्किन टँक तलावाच्या पाळीपासून ते गुरूदत्त मंगल कार्यालयाच्या परिसरात रस्ता बांधकामाचे काम हाती घेण्यात आले होते. सिव्हील लाईन परिसरातील मुलींच्या वसतीगृहापासून ते वनविभाग कार्यालयाच्या मागील बाजू पर्यंत डांबरीकरणाचे काम करण्यात आले. या मार्गाहून रेवाबेन पटेल महाविद्यालय, मुलींचे वस्तीगृह, परिसरातील नागरिक रहदारी करतात. या रस्त्याहून शेकडो विद्यार्थीनींची रेलचेल असते.
कॉलेज मार्गाला जोडणारा हा रस्ता सिव्हील लाईन परिसरालाही जोडतो त्यामुळे या रस्त्याचे विशेष महत्व आहे. मात्र काही महिन्यांपुर्वी या रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर त्याचे पितळ उघडे पडले.
मुलींचे वस्तीगृह ते वनविभाग कार्यालयपर्यंतच्या रस्त्यावरील चुरी व डांबर उखडल्याने गिट्टी व मोठे बोल्डर रस्त्यावर पसरले आहे. कॉलेज मार्गाहून आतमध्ये प्रवेश करताच हे दृश्य सर्रास पहायला मिळते. जवळपास २०० मीटरच्या रस्त्याच्या बांधकामाला लक्षावधी रूपयांचा खर्च झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट तुमसर येथील एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र रस्त्याची स्थिती पाहून बांधकामाची गुणवत्ता किती श्रेष्ठ आहे हे लक्षात येते.
रस्त्यावरील बोल्डर वर आल्याने दुचाकीवाहन चालकांना जीव मुठीत घेवून रहदारी करावी लागत आहे. याच रस्त्यावर रेवाबेन पटेल नामक नामांकित महाविद्यालय असून उच्च विद्याविभूषित प्राचार्य गणांसह अनेकवेळी खासदार, आमदार व अन्य पदाधिकारीही याच रस्त्याचे ये-जा करतात.
मात्र रस्त्याच्या स्थितीबाबत कुणीही बोलायला तयार नाही. सायंकाळच्यानंतर या परिसरात जास्त वर्दळ नसते. मात्र कॉलेजच्या वेळेवर विद्यार्थीनींची मोठी गर्दी असते. रस्त्यावर चुरी पसरली असल्याने वाहन स्लिप होवून केव्हा अपघात होईल याची शाश्वती नाही.
राज्य बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे सदर रस्त्याचे बांधकाम झाले नसल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहिती अंतर्गत प्रथम दर्शनी लक्षात येते. रस्त्याचा दर्जा पाहून बांधकामात गैरव्यवहार झाल्याचेही परिसरात चर्चा आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व सदर रस्त्याचे बांधकाम संबंधित विभागाच्या धोरणानुसार करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)