लाखोंचा महसूल तरीही बाजारात कचराकोंडी

By Admin | Updated: July 22, 2016 00:44 IST2016-07-22T00:44:14+5:302016-07-22T00:44:14+5:30

जिल्ह्याचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहरातील हृदयस्थानी वसलेल्या आठवडी बाजाराचे कुणी सौंदर्य बघितले ...

Millions of revenues still reel in the market | लाखोंचा महसूल तरीही बाजारात कचराकोंडी

लाखोंचा महसूल तरीही बाजारात कचराकोंडी

व्यथा आठवडी बाजाराची : अतिक्रमणाची समस्या सुटेना, बाजाराच्या विकासासाठी निधीचा वाणवा
इंद्रपाल कटकवार भंडारा
जिल्ह्याचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहरातील हृदयस्थानी वसलेल्या आठवडी बाजाराचे कुणी सौंदर्य बघितले तर भोवळ आल्याशिवाय राहणार नाही. दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील नागरिक गलिच्छ परिसरात बाजारासाठी येण्याचे धाडस तरी कसे करतात, असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. नगर पालिका प्रशासनाला लाखोंचा महसूल देणारा आठवडी बाजार विकासाच्या गर्तेत रखडला आहे. अतिक्रमण व मुलभूत सुविधांचा अभाव या बाजाराची वैशिष्टे आहे.

शहरातील रविवारी बाजारपेठ म्हणून अशी जुनी ओळख असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालय परिसरात मोठा बाजार भरतो. रविवारी मुख्य बाजार तर बुधवारी लहान बाजार भरतो. सर्व प्रकारच्या भाज्या येथे मिळत असल्याने रविवारी मोठ्या संख्येने भंडारेकर बाजारासाठी येत असतात. मोठ्या बाजारातील हनुमान मंदिर परिसर ते पोष्ट आॅफिस चौकापर्यंतचा भाग व तिथून गभने चौरस्ता व परत शर्मा बालोद्यानपर्यंतचा भुभाग मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. असंख्य दुकाने, उपहारगृहे, फेरीवाले यासह भाजीपाल्यांची थोक व चिल्लर दुकाने आहेत.
अनाज मंडीच्या मागे असलेल्या सिमेंटी ओट्यापासून बाजाराची सुरूवात होते. येथूनच मागच्या बाजुला असलेल्या दुर्गा मंदिराच्या मागे मटण मार्केट आहे. याच्याच विरूद्ध दिशेला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या समोर मोठा भाजी बाजार भरतो. मात्र या बाजारात सुविधांचा वाणवा आहे. पावसाळ्यात बाजारात जातो, असे म्हटल्यास सर्वात प्रथम दृष्टीक्षेपात तिथे असलेला चिखल नजरेस पडतो.
अतिक्रमणाने वेढलेले सिमेंटी ओटे, तुटलेले शेड्स, मुतारीघराची दुरवस्था, खड्डे, निमुळत्या व अरूंद नाल्यांमध्ये साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, समिती कार्यालयाच्या सभोवताल साचलेली दुर्गंधी ही या आठवडी बाजाराचे विशेष आकर्षण आहे.

भंडाराच्या विकासात आठवडी बाजाराचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे. बाजारात अतिक्रमणाची समस्या मुख्य असून त्यावर आमचे कार्य सुरू आहे. भविष्यात यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. यात कुणाचीही गय केली जाणार नाही.
-बाबुराव बागडे, नगराध्यक्ष भंडारा.
बाजाराच्या विकासाबाबत विशेष सभा बोलवावी, अशी मागणी कित्येकदा केली आहे. परंतु पालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. सन २००९ फेरीवाले धोरण नगरपालिका प्रशासनाने अंमलात आणल्यास शहरातील वाहतुकीसह बाजाराची समस्या ९० टक्के निकाली निघू शकते. बाजारात सिमेंटी ओटे, शेड्स, मुतारीघर, पक्के रस्ते व नाल्यांची बांधणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
-हिवराज उके, नगरसेवक भंडारा.

 

Web Title: Millions of revenues still reel in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.