रोहयोच्या कामात लाखोंचा गैरव्यवहार
By Admin | Updated: March 5, 2016 00:40 IST2016-03-05T00:40:21+5:302016-03-05T00:40:21+5:30
केसलवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट तेलपेंढरी, केसलापुरी व सालेवाडा या तीन गावांमध्ये करण्यात आलेल्या मग्रारोहयो, लाखो रूपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला.

रोहयोच्या कामात लाखोंचा गैरव्यवहार
बोगस मजूर, बोगस हजेरी : निधी हडपल्याची कबुली, सरपंच, सचिवाचे कानावर हात
अड्याळ : केसलवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट तेलपेंढरी, केसलापुरी व सालेवाडा या तीन गावांमध्ये करण्यात आलेल्या मग्रारोहयो, लाखो रूपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. बोगस मजुरांची नावे नोंद करीत बनावट हजेरींच्या आधारे निधी हडपल्याची कबूली खुद्द रोजगार सेवकांनी दिली. याप्रकरणाचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्यात आला असून सखोल चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
केसलवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावात रोजगार हमी योजनेखाली विविध कामे करण्यात आली. एम.आर. बारसागडे नामक रोजगार सेवकाची गेल्या आठ वर्षापासून या कामावर देखरेख आहे. तथापि, रोहयोच्या कामात मोठा घोळ केला आहे. गावात राहत नसलेल्या व्यक्ती, लग्न होवून सासरी गेलेल्या महिला, बँकेत काम करणारा चपराशी अशांची नावे हजेरी पुस्तीकेवर नोंद करून त्यांच्या नावावरची मजुरी रोजगार सेवक हळप करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या कुटूंबातील सदस्य कामावर नसतानाही बोगस हजेरी दर्शवून प्रत्येक्षात कामावर असणाऱ्यांपेक्षा जास्त मजुरी काढल्याचे दिसून आले. याविरोधात तक्रार करण्याचे कुणी सांगितले तर या मजुरांना कामावरून बंद करण्याची किंवा मजुरी कमी काढण्याची धमकी दिली जायची. रोहयो कामावर हजर मजुरांची नावे एका वहीवर नोंदवायची आणि नंतर घरी जावून बोगस मस्टर भरायचे, असा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मस्टरवरील एम.आय.एस.मध्ये ग्रामसेवक किंवा सरपंचांची स्वाक्षरी आवश्यक असली तरी या दोघांपैकी एकाचीही स्वाक्षरी घेतली गेली नाही. स्वत:च मस्टर मंजुर करून त्याने पैशाची उचलही केली आहे. रोहयोच्या प्रत्येक कामावर सुमारे ३५ मजुरांची बोगस नावे दर्शवून त्याने गेल्या पाच वर्षात लाखो रूपये हळपल्याची माहिती आहे. दरम्यान हे प्रकरण उघड झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता रोजगार सेवकाने घोटाळा केल्याची कबूली देत चूक मान्य केली. मात्र राजीनामा देण्यास तो तयार नाही. गेल्या पाच वर्षापासून हा प्रकार सुरू असताना आपल्याला कल्पना नाही, असे ग्रामसेवक आणि सरपंच सांगतात. परंतु हा निधी त्यानेच हडप केला की इतरांचाही संबंध आहे याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.
चौकशीनंतर प्रकरणाचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्यात आला आहे. सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाई करीत हळप करण्यात आलेला निधी वसूल करण्याची मागणी ग्रामस्थांसह तक्रारकर्ता बालक गजभिये यांनी केली आहे. (वार्ताहर)