आरक्षित डब्यातून दुधाची वाहतूक
By Admin | Updated: February 21, 2016 00:21 IST2016-02-21T00:21:01+5:302016-02-21T00:21:01+5:30
गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवासी रेल्वे गाडीत आरक्षित डब्यातून मागील अनेक वर्षापासून दुधाच्या डब्ब्यांची सर्रास वाहतूक सुरु आहे.

आरक्षित डब्यातून दुधाची वाहतूक
महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील प्रकार : रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रवासी त्रस्त
मोहन भोयर तुमसर
गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवासी रेल्वे गाडीत आरक्षित डब्यातून मागील अनेक वर्षापासून दुधाच्या डब्ब्यांची सर्रास वाहतूक सुरु आहे. दूध व्यवसायाकरिता सन २००५ पासून या गाडीत स्वतंत्र डब्याची सोय रेल्वे प्रशासनाने केली आहे. एकीकडे नियमावर बोट ठेवणारे रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रशासनाला आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास बंदी केली आहे हे विशेष.
भारतीय रेल्वे प्रवाशांना जागतिक सोयी सुविधा तथा सुरक्षा पूरविण्याचा दावा करीत आहे. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस दररोज गोंदिया येथून सुटते. या गाडीत तिरोडा, तुमसर रोड व भंडारा येथून कामठी, इतवारी व नागपूर येथे दूध व्यावसायिक दूध विक्रीला नेतात. लहान मोठे दुधाच्या डब्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. पूर्वी ते वाहतूक प्रवासी डब्यातून करायचे.
सन २००५ मध्ये तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध व्यावसायिकांकरिता एक स्वतंत्र कोच (डबा) लावण्यात यशस्वी झाले. पंरतु या स्वतंत्र डब्याव्यतिरिक्त अन्य आरक्षित डब्यातूनही दूध व्यावसायिक दुधाचे डब्बे वाहतूक करीत आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील कोच क्रमांक एस ९ व एस १० मध्ये दुधाच्या डब्यांची सर्रास वाहतूक सुरु आहे हे कोच आरक्षित आहेत. या डब्यात सर्वसाधारण तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनाई आहे. प्रवास करताना आढळल्यास त्या प्रवाशांना ३०० ते ६०० रुपये दंड आकारला जातो. उलट दूध व्यावसायिकांना मात्र येथे कोणीच मनाई करीत नाही.
या प्रवासी गाडीत गोंदिया येथून एक मुख्य तिकीट निरीक्षक तथा त्यांची १० ते १५ सहायक निरीक्षकांची तपासणी पथक दररोज कर्तव्य बजावतात. राज्याच्या उपराजधानीत ही प्रवासी गाडी जाते. नागपूर येथे रेल्वेचे मुख्यालय आहे. दूध वाहतूक करणाऱ्यांना रोखण्याची हिंमत कुणातच दिसत नाही. सामान्य प्रवासी मात्र येथे बघ्याची भूमिका घेतांनी दिसतात.