गोसेखुर्द धरणात स्थलांतरीत पक्ष्यांचे थवे
By Admin | Updated: March 26, 2016 00:26 IST2016-03-26T00:26:04+5:302016-03-26T00:26:04+5:30
गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्यामुळे धरणाचे सौंदर्य खुलले आहे. मोठ्या संख्येने आलेल्या ‘स्पॉट बिल्ड डक’च्या थव्यानी सौंदर्यात भर पडली आहे.

गोसेखुर्द धरणात स्थलांतरीत पक्ष्यांचे थवे
स्पॉट बिल्ड डक : शिकारीपासून वाचविण्याची गरज
पवनी : गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्यामुळे धरणाचे सौंदर्य खुलले आहे. मोठ्या संख्येने आलेल्या ‘स्पॉट बिल्ड डक’च्या थव्यानी सौंदर्यात भर पडली आहे. अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने आलेले हे स्थलांतरित पक्षी जलविहार करताना पाहून पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
मागील दोन-तीन वर्षांपासून गोसेखुर्द धरणावर ‘स्पॉट बिल्ड डक’ हे स्थलांतरित पक्षी येत आहेत. हे पक्षी सायबेरीया, लद्दाख, मंगोलिया, बलुचिस्तान, कज्जाखिस्तान आदी देशातून हजारो कि.मी.चा प्रवास करुन दरवर्षी येतात. मागीलवर्षी ८-१० जोड्या आल्या होत्या. यावर्षी शेकडोंच्या संख्येने या पक्ष्यांच्या जोड्या आल्या आहेत.
गोसेखुर्द धरणाच्या खालच्या भागात जिथे पाण्याचा प्रवाह कमी असून निथळ पाणी आहे तिथे हे पक्षी आले आहेत.
हे पक्षी समुहाने राहतात. नर व मादी हे जोडीनेच राहणे पसंत करतात. तपकिरी, कत्था रंगाचे पक्षी असून पंखावरती पांढरी किनार असते व तयावर ठिपके असल्यामुळे हे पक्षी ‘स्पॉड बिल्ड डक’ या नावाने ओळखले जातात. या पक्षांचे पाय व चोच तपकिरी रंगाची आहे. नर पक्षाच्या चोचींवर पिवळसर रंगाची लांबट रेषा असते. या पक्षांच्या विनीचा हंगाम जुन ते सप्टेंबर महिना असतो. हे पक्षी गोडे पाण्यात राहत असून या पक्षांचे खाद्य पानगवत, मासे, शिंपळे आदी असते.
गोसीखुर्द धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठ्याची निर्मिती झाल्यामुळे दरवर्षी येथे येणाऱ्या विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या वाढत आहे. येथे येणाऱ्या स्थलांतरीत पक्षांकरिता पोषक वातावरण आहे. त्यामुळेच येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची संख्या वाढत आहे.
यावर्षी येथे अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने हे स्थलांतरित पक्षी जलविहार करतांना पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. या स्थलांतरित पक्ष्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. स्थलांतरित पक्ष्यांचा परिसर प्रतिबंधीत करणे आवश्यक असून या पक्षांच्या शिकारीवर निर्बंध आणने गरजेचे आहे. धरणामध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे गोसेखुर्द धरण पर्यटक, अभ्यासक, पक्षीमित्रांसाठी पर्वनीच ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)