म्हाडाने २२ वर्षांत बांधली केवळ ५५६ घरे
By Admin | Updated: October 30, 2015 00:43 IST2015-10-30T00:43:39+5:302015-10-30T00:43:39+5:30
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ अर्थात म्हाडाने जिल्ह्यात २२ वर्षांत केवळ ५५६ घरे बांधली आहेत.

म्हाडाने २२ वर्षांत बांधली केवळ ५५६ घरे
कामाचा वेग मंदावला : पाच हेक्टर जागेची खरेदी, २० हेक्टर शासकीय जमिनीचा शोध सुरू
नंदू परसावार भंडारा
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ अर्थात म्हाडाने जिल्ह्यात २२ वर्षांत केवळ ५५६ घरे बांधली आहेत. सामान्यांना स्वस्तात घरे देण्याचा दावा करणाऱ्या म्हाडाने सन १९९३ पासून केवळ दोन वसाहती निर्माण केलेल्या आहेत.
म्हाडाने स्वस्त घरे तर दिलीच नाहीत, मात्र त्यासाठी फारसी जनजागृतीसुद्धा केली नाही. कासवगतीने म्हाडाचे काम सुरु राहिल्यास भाड्याच्या घरात संसार चालविणाऱ्यांना हक्काचा निवारा निर्माण करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बिल्डर्सकडून घरे घेणे किंवा भूखंड विकत घेऊन त्यावर घर बांधणे, हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील सदस्यांची भिस्त म्हाडाच्या घरांवर आहे. भंडारा येथे म्हाडाचे काम १९९३ मध्ये सुरु झाले. १९९३ ते १९९७ मध्ये २.६७ हेक्टर जागेवर विदर्भ हाऊसिंग कॉलनी निर्माण करुन १५२ घरे बांधली. यात अत्यल्प उत्पन्न गटातील ९६ घरे, अल्प उत्त्पन्न गटातील २४ आणि ३२ अशी घरे बांधण्यात आली.
त्यानंतर म्हाडाने सन १९९७-९८ मध्ये खातरोड मार्गावर २२.६८ हेक्टर म्हणजे ५६ एकर जागा खरेदी केली. याठिकाणी अल्प उत्त्पन्न गटासाठी १६४ तर मध्यम उत्त्पन्न गटासाठी ५० भूखंड देण्यात आले. याशिवाय मध्यम उत्त्पन्न गटासाठी १० घरे, अल्प उत्त्पन्न गटासाठी २०० घरे बांधण्यात आली. त्यानंतर २००७-०८ पासून उच्च मध्यमवर्गीय उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी १७ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी ३५ घरे बांधली. सन २००९-१० मध्ये अल्प उत्पन्न गटासाठी ३१ घरे, २०१२-१३ मध्ये उच्च उत्पन्न गटासाठी ३४ तर २०१३-१४ मध्ये अल्प उत्पन्न गटासाठी ९ घरे बांधली अशी आतापर्यंत या परिसरात ४०६ घरे बांधली. याशिवाय २१४ भूखंडाचे हस्तांतरण केले. त्यानंतर मात्र घरकुल बांधणीचा वेग मंदावला. म्हाडाकडून अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी घरे बांधून देण्याची तथा क्षेत्र विकास करून देण्याची म्हाडाची योजना आहे. आर्थिक उत्पन्नावर गट पाडले जातात. १६ हजारापर्यंत मासिक उत्पन्न असलेले कुटुंब अत्यल्प उत्पन्न गटात मोडले जाते. १६ ते ४० हजार म्हणजे अल्प उत्पन्न गट, ४० ते ७० हजार मासिक मिळकत असलेले मध्यमवर्गीय तर ७० हजारांहून पुढे उत्पन्न असलेले कुटुंब उच्च मध्यमवर्गीय गटामध्ये मोडतात. घरे किंवा भूखंडाची किंमत म्हाडाकडून ठरविण्यात येते.
म्हाडाच्या घरांचे बांधकाम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार राहत असल्यामुळे या घरांसाठी लोकांची मोठी मागणी असते. खातरोड मार्गावरील दुकानांसाठी दररोज लोकांकडून विचारणा होत असते. म्हाडाने कमी दरात घरे बांधून देण्याची सुविधा जनतेसाठी केली आहे. त्यामुळे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
- रविना नरवरिया,
कनिष्ठ अभियंता म्हाडा भंडारा.
शासकीय जमिनी मिळविण्याचे नियोजन
तुमसर रोड मार्गावरील आयटीआयच्या मागील परिसरातील ५.४० हेक्टर जागा म्हाडाने विकत घेतली आहे. याशिवाय २० हेक्टर शासकीय जमिन मिळविण्यासाठी म्हाडाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने सर्वच शहरासाठी ‘परवडणारा हाऊसिंग प्लॉन’ तयार केला आहे. शासकीय जमिनी मिळाल्यास अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना वाजवी दरात घरे उपलब्ध करून देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
दुकानांची चाळ तयार
खात रोड मार्गावर २४ दुकानांची चाळ आणि तीन सभागृहाचे काम पुर्णत्वास आले आहे. काही काम शिल्लक असून काम पूर्ण होताच ही दुकाने विकण्यात येणार आहे. साधारणत: घरे बांधणीची सोडत काढण्यात येते. परंतु याठिकाणी दुकानांचे बांधकाम स्वत: करुन अधिक नफा कमविण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. ही जागा मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या दुकानांसाठी मागणीही अधिक आहे.