ढोलताशांचा गजर गणरायांना निरोप
By Admin | Updated: September 28, 2015 00:43 IST2015-09-28T00:43:38+5:302015-09-28T00:43:38+5:30
ढोलताशांचा गजर व तरूणाईच्या जल्लोषात आज रविवारी अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर ‘गणपती बाप्पा मोरया,....

ढोलताशांचा गजर गणरायांना निरोप
भंडारा : ढोलताशांचा गजर व तरूणाईच्या जल्लोषात आज रविवारी अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या घोषणेत लाडक्या गणरायांना निरोप देण्यात आला. शहरातील तलावांसह वैनगंगा नदी पात्रात विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणीही सार्वजनिक मंडळासह घरगुती गणरायांचे विसर्जन करण्यात आले.
कोट्यवधी हिंदूचे आराध्य व लाडके दैवत असलेल्या श्री गणरायांचे आज विधीवत वैनगंगा नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले. मागील ११ दिवस गणरायांच्या सेवेत घालविल्यानंतर गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जय्यत तयार केली होती. भंडारा शहरात पोलिसांच्या परवानगीनुसार काही सार्वजनिक मंडळांनी गणपती बाप्पांचे विसर्जन केले. ‘भंडाराचा राजा’ व ‘गणेशपूरचा दाता’ या सार्वजनिक गणरायांचे विसर्जन ३० सप्टेंबरला करण्यात येणार आहे. तरूणाईने मिरवणुकीचा आनंद घेतला.
मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती विसर्जनासाठी येत असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज रविवारी सकाळपासूनच तलाव व नदीकाठावर चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेले विसर्जन रात्री ९ वाजतापर्यंत सुरूच होते. (प्रतिनिधी)