लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आजपर्यंत जंगलालगतच्या विहिरींमध्ये पडून अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या शाेधात आलेल्या या वन्यजीवांचा नाहक बळी जाताे. महिनाभरापूर्वी सायफन विहिरीत पडून वाघाच्या दाेन बछड्यांचा मृत्यू झाला हाेता. यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आता जंगलालगतच्या विहिरींना जाळीचे आच्छादन लावले जात आहे. भंडारा वनविभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल असून, काेका, नवेगाव, नागझिरा आणि पवनी कऱ्हांडला अभयारण्य आहे. माेठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. अनेकदा वन्यजीव जंगलालगतच्या शेतशिवारातही येतात. यात हिंस्त्र आणि तृणभक्षी प्राण्यांचा समावेश असताे. अनेकदा पाण्याच्या शाेधात हे प्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. १२ मे राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्याच्या सायफन विहिरीत पडून वाघाच्या दाेन नवजात मादी बछड्यांचा मृत्यू झाला हाेता. तसेच वर्षभरापूर्वी अड्याळ परिसरात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला हाेता. असे अनेक प्रकार घडत आहेत. बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यूनंतर वनविभाग सतर्क झाला. मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार यांनी गराडा गावाला भेट देऊन परिसरातील सर्व विहिरींना जाळी लावण्याचे निर्देश दिले.त्यानुसार गराडाच्या साडेपाच किमी परिसरातील ३५ विहिरींना जाळी लावण्याचे काम करण्यात आले. ज्या सायफन टाकीत दाेन बछडे मृत्यूमुखी पडले हाेते, तेथे लाेखंडी जाळीचे आच्छादन लावण्यात आले आहे. निधी उपलब्धतेनुसार सर्व विहिरींना लाेखंडी जाळ्या लावल्या जाणार आहेत. शामाप्रसाद मुखर्जी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्येही विहिरींवर जाळी लावली जात आहे. काेका अभयारण्यालगतच्या ४० ते ५० गावांत लाेखंडी जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाेबतच तुमसर तालुक्यातील नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रातही विहिरींना आच्छादन घालण्यात आले आहे. नवजात वन्यप्राणी विहिरीत पडून मृत्यूमुखी पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
वन्यजीवांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य
वाघाचा संचार असलेल्या परिसरात वनविभागाने गस्त वाढविली आहे. परिसरातील नागरिकांनाही वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन्यजीवांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन भंडाराचे उपवनसंरक्षक शिवराम भलावी यांनी केले आहे.
पाण्यात बुडून वन्यजीवांचा मृत्यू हाेऊ नये म्हणून वनविभागाने पुढाकार घेतला आहे. भंडारा तालुक्यातील गराडा परिसरातील ३२ विहिरांना सुरक्षा कठडे लावण्यात आले आहेत. निधी उपलब्ध हाेताच भंडारा वनपरिक्षेत्रातील जंगलालगतच्या सर्व विहिरींना लाेखंडी जाळ्या लावण्यात येतील.
- विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारा