Merchant aggressive against Break the Chain | ब्रेक द चेनच्या विरोधात व्यापारी आक्रमक

ब्रेक द चेनच्या विरोधात व्यापारी आक्रमक

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नगरपरिषद-पोलीस ठाण्यावर धडक, बाजारपेठ बंद, रस्त्यावर गर्दी

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाने घोषित केलेल्या ब्रेक द चेनच्या विरोधात भंडारा शहरातील व्यापारी बुधवारी आक्रमक झाले. गांधी चौकात एकत्र येऊन नगर परिषदेसह पोलीस ठाण्यावर धडक दिली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन दोन दिवसांत निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करून दुकाने उघडण्याचा इशारा दिला. दरम्यान, संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद असली तरी रस्त्यावर मात्र नागरिकांची गर्दी दिसत होती.
कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने शासनाने मिनी लाॅकडाऊन घोषित केला आहे. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी झाली; परंतु बाजारपेठ बंदचा मंगळवार दिवस असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी आपली प्रतिष्ठाने उघडायला गेली तेव्हा नगर परिषदेच्या पथकाने त्याला विरोध केला. गांधी चौकातील गणेश ऑपसेट हे प्रतिष्ठान साहित्य बाजार काढण्यासाठी काही वेळासाठी उघडले. त्याच वेळी नगर परिषदेचे कर्मचारी तेथे आले. त्यावरून मोठा वाद झाला. त्यामुळे सर्व व्यापारी गांधी चौकात एकत्र आले. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर हा जमाव भंडारा पोलीस ठाण्यावर पोहोचला. तब्बल तासभर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली होती. अखेर त्यांची समजूत काढण्यात यश आले. 
त्यानंतर व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांना निवेदन दिले. लाॅकडाऊन करायचे तर करा. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार, आम्ही घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाने द्यावे अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आदेश शासनाचे आहेत, आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगितले. त्यावेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शासनाने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू आणि दुकाने उघडू, असा इशारा दिला. यावेळी भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर बिसेन, सोनू वाधवानी, विक्की रावलानी, विकास मदनकर, राजकुमार भोजवानी यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असला तरी शहरातील रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.

सांगा आम्ही जगायचे तरी कसे?
 वर्षभरापासून कोरोनाने व्यापार, व्यवसाय ठप्प झाला आहे. आता पुन्हा शासनाने वीकेंड लाॅकडाऊन घोषित केले. मात्र, यात चलाखी करून संपूर्ण सातही दिवस बाजारपेठ बंद ठेवली जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही जगायचे कसे? दुकानातील कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा कसा, असा सवाल व्यापारी विचारत होते. रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या विक्रेत्यांचा तर आणखी गहन प्रश्न आहे. दुकान उघडले नाही तर रात्री आमची चूलही पेटणार नाही. आम्ही करायचे तरी काय, असा प्रश्न विचारला जात होता.

शासनाने घोषित केलेला ‘ब्रेक द चेन’ नव्हे तर ‘ब्रेक द लाइफ’ ठरू पाहत आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून सर्व व्यापारी त्रस्त झाले आहेत. कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा स्थितीत पुन्हा लाॅकडाऊन केले जात आहे. शासनाने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आम्ही दुकाने उघडू. प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शासनानेही सहानुभूतीपूर्वक विचार करून या लाॅकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्याची गरज आहे. असे झाले नाही तर आंदोलन तीव्र करू.
-मयूर बिसेन, जिल्हाध्यक्ष भाजप व्यापारी आघाडी

 

Web Title: Merchant aggressive against Break the Chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.