दिवठे यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणार
By Admin | Updated: August 3, 2015 00:26 IST2015-08-03T00:26:34+5:302015-08-03T00:26:34+5:30
माणूस बदलतात, पिढ्या बदलतात. नेतृत्वही बदलत असते, पंरतु चांगले विचार कधीही बदलत नाही.

दिवठे यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणार
देवेंद्र फडणवीस : लाखांदूर येथे श्रध्दांजली कार्यक्रम
लाखांदूर : माणूस बदलतात, पिढ्या बदलतात. नेतृत्वही बदलत असते, पंरतु चांगले विचार कधीही बदलत नाही. चांगले कार्य करण्याची प्रेरणा माजी खासदार नामदेवराव दिवठे यांनी सदैव दिले आहे. अश्या कर्तुत्ववान व निस्वार्थ व्यक्तीच्या नावाने लाखांदूर येथे स्मारक उभारणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लाखांदूर येथे माजी खासदार दिवंगत नामदेवराव दिवठे यांच्या श्रध्दांजलीपर कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर ना.नितीन गडकरी, ना. राजकुमार बडोले, ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार नाना पटोले, आमदार राजेश काशिवार, आ. अॅड. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे माजी खा. शिशुपाल पटले, अशोक नेते, माजी आ. देवराम होळी, दयाराम कापगते, आ. अनिल सोले, आ. क्रिष्णा गजभिये, बाबुराव कोचे, श्याम झिंगरे, भाजपचे तालुकाध्यक्ष वामन बेदरे, तारिक कुरैशी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कर्तृत्ववान, निस्वार्थी व विचारांची सांगड घालून समाजकार्याचा वसा घेणारा सच्चा कार्यकर्ता आपल्यामधून नामदेवरावांच्या रुपाने निघून गेले आहे. ही कधी न भरुन काढणारी क्षती आहे. ना. गडकरी यांनीही दिवठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. १९४७ च्या सत्याग्रहात नामदेवराव तुरुंगात गेले. कठिण काळातही त्यांनी भाजपासह जनसंघाचे कार्य उमेदीने पुढे नेले. यानंतर श्रध्दांजली कार्यक्रमात ना. राजकुमार बडोले, खा. पटोले, बाळा काशीवार यांनीही श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान मागील महिन्यात पुरात वाहून गेलेल्या गोपीचंद आडकीणे यांच्या कुटुंबीयाला पाच लाखांची मदत धनादेशाच्या रुपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
हेलिकॉप्टरची इमरजन्सी लँडिंग
श्रध्दांजली कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येणार असल्याने पिंपळगाव कोहली मार्गावरील दसरा मैदानात व अंतरगाव येथे दोन हेलिपॅट तयार करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पावसाच्या हजेरीमुळे पायलटने सुरक्षा व्यवस्था बाजूला सारुन कार्यक्रमस्थळाला लागुन असलेल्या खुल्या जागेवरच हेलिकॉप्टरची इमरजन्सी लँडिंग केली