तासाभरात गुंडाळली नियोजन समितीची सभा
By Admin | Updated: November 6, 2015 02:00 IST2015-11-06T02:00:15+5:302015-11-06T02:00:15+5:30
जिल्हा नियोजन समितीने कार्यवाही यंत्रणांना दिलेला निधी दिलेल्या कालावधीत खर्च होत नाही, ही बाब अतिशय

तासाभरात गुंडाळली नियोजन समितीची सभा
भंडारा : जिल्हा नियोजन समितीने कार्यवाही यंत्रणांना दिलेला निधी दिलेल्या कालावधीत खर्च होत नाही, ही बाब अतिशय गंभीर आहे. यंत्रणांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च केला किंवा नाही याची सत्यता पडताळून समितीसमोर ठेवावी. तसेच हा निधी कुठे आणि कसा खर्च करण्यात आला याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांना पुढील बैठकीच्या आधी देण्यात यावी. यासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेता बैठक स्थगित करण्यात आल्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी धीरज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे उपस्थित होते.
यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन कमी झाल्याचे पंचनामे करता येऊ शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतीचे पंचनामे नियमित होत असतात, असा प्रश्न केला. यावर पालकमंत्र्यांनी शासनाच्या कार्योत्तर मंजूरीच्या अधीन राहून शेताचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. खासदार नाना पटोले यांनी २०१५-१६ मध्ये जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्यात आलेल्या पीक कर्ज वाटप लाभार्थ्यांच्या याद्या जाहिर करण्यासाठी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ च्या खचार्चा आढावा घेतांना कृषी व संलग्न सेवा यासाठी १० कोटी ८५ लक्ष ७३ हजार रुपयांच्या नियतव्ययापैकी ३ कोटी २६ लक्ष ४८ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. यावर आ.वाघमारे यांनी लोकप्रतिनिधींना न विचारता कामे घेत असल्याची बाब उपस्थित केली. यासंदर्भात सर्व विभागांनी जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येणाऱ्या कामांची मंजूरी लोकप्रतिनिधीकडून घेतल्याचे हमीपत्र जिल्हा नियोजन समितीकडे सादर केल्यानंतरच प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. एखाद्या विभागाला बांधकाम करावयाचे असल्यास तांत्रिक मंजुरी देणारा विभाग मंजुरी देत नसल्यामुळे ती कामे प्रलंबित राहत असल्याचा मुद्दा समोर आला. अशा कामांसाठी तांत्रिक यंत्रणेला वर्ग करण्यात आलेला निधी पडून असतो ही बाब समोर आली. त्यामुळे सर्व विभागाने त्यांच्याकडे असलेल्या अखर्चित निधीची माहिती नियोजन समितीच्या सदस्यांसमोर ठेवल्याशिवाय ही बैठक पुढे सुरु न ठेवण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. पुढील बैठकीपूर्वी इत्यंभूत माहिती समितीच्या पदाधिकांऱ्याकडे ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले. ही बैठक दिवाळीनंतर घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. (प्रतिनिधी)
डिसेंबरमध्ये महिला रुग्णालयाचे भूमिपूजन
४खासदार नाना पटोले यांनी महिला रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला. यावर पालकमंत्र्यांनी जिल्हा महिला रुग्णाल्याची जागा निश्चित करण्यात आली असून नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यासंबंधीचे अंदाजपत्रक युध्द पातळीवर तयार करुन डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात नागपूर येथे होणाऱ्या बैठकीत सादर करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार यांना दिले.