औषधोपयोगी कडूनिंब झाले कमी
By Admin | Updated: May 30, 2014 23:30 IST2014-05-30T23:30:07+5:302014-05-30T23:30:07+5:30
आयुर्वेदातील औषधी महावृक्ष म्हणून कडूलिंबाचे स्थान असले तरी ग्रामीण भागात या वृक्षाची कल्पतरु म्हणून प्रचिती आहे. वर्षभर हिरव्यागार, डेरेदार दिसणार्या या वृक्षाची पाने करवतीच्या धारेसारखी कडा

औषधोपयोगी कडूनिंब झाले कमी
सासरा : आयुर्वेदातील औषधी महावृक्ष म्हणून कडूलिंबाचे स्थान असले तरी ग्रामीण भागात या वृक्षाची कल्पतरु म्हणून प्रचिती आहे. वर्षभर हिरव्यागार, डेरेदार दिसणार्या या वृक्षाची पाने करवतीच्या धारेसारखी कडा असलेली असतात. चैत्र महिन्यात नवीन पालवी व पांढर्या फुलांचा बहर दिसतो. या वृक्षाखाली विसावा घेणार्याला सुखद गारवा देणारे ही झाडेसुद्धा कमी झाली आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी व आबालवृद्ध दंतवन म्हणून याच्या लहान काड्यांचा उपयोग करतात. विविध प्रकारच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून याची कोवळी पाने नियमित सेवन करतात. शेतकरी वर्ग कडधान्यांना कीड लागू नये, वाळलेली पाने त्यात घालून कडधान्य वर्षभर सुरक्षित ठेवतात. कित्येक याच्या निंबोळ्यांचा अर्क काढून शेतातील पिकांवर फवारतात. औषधीयुक्त असलेला हा वृक्ष डेरेदार, असतो. आयुर्वेदात कडुलिंबाचे अनन्यसाधारण महत्व आहे. या वृक्षातील निम्बिडीन हे उपयुक्त द्रव मानले जाते .यामुळेच या वृक्षाला कीड लागत नाही. याच्यातील औषधीगुणाने हा वृक्ष आयुर्वेदात एक तत्व म्हणून ओळखला जातो.
कडुनिंबाच्या पानांचा कडू रस शरीरातील कफदोषावर उत्तम उतारा समजला जातो. कडूरसाच्या सेवनाने रक्तशुद्धी होते. पोटातील कृमी, जंत याविकारावर उत्तम कार्य करते. या व्यतिरिक्त प्रतिकारशक्तीत वाढ, त्वचारोग, खाज, जखम सुधारते, व्रण पडू न देणे यावर या वृक्षाच्या पानांचा रस उपयुक्त समजला जातो. गोवर, कांजण्या झालेल्या रोग्या या झाडाच्या स्वच्छ पानावर झोपवतात. याचा अर्क काढून आंघोळ करून देतात. यात अँटीसेप्टीक व डिसइन्फेक्टेड हे महत्वाचे गुण आहेत. बाळंतीणीलाही याच्या पानाची धुरी देण्याचा प्रघात आहे. या वृक्षाला काही लोक ब्रम्हदेवाचे तर काही जगन्नाथाचे प्रतिक मानतात. या वृक्षाला तोडणे अशुभ मानले जाते. धार्मीक महत्व प्राप्त झालेला हा वृक्ष दुर्गादेवीचा प्रिय वृक्ष म्हणून समजला जातो. ग्रामीण भागातही या वृक्षाखाली ग्रामदेवता माता माऊलीची स्थापना करण्यात आल्याचे दिसून येते. या वृक्षाला जीवनवृक्ष असेही म्हटले जाते. वृक्षांचे धार्मिक महत्व जाणून घेतल्यास वृक्षतोडीला आळा बसेल असे यावरून दिसून येते. निवारा, छाया, सुवास, अन्न, शुद्ध हवा, औषधे, फळे, फुले देतात. त्यांच्यातील सर्व गुणांचा आदर करून जोपासना महत्वाची आहे. ग्रामीण भागात कडूनिंब हा कल्पवृक्ष आहे. (वार्ताहर)