मशरूम शेतीतून महिला बचत गटाची स्वयंपूर्णतेकडे झेप
By Admin | Updated: January 20, 2016 00:51 IST2016-01-20T00:51:11+5:302016-01-20T00:51:11+5:30
वर्षानुवर्षे चुल आणि मुल यात गुरफटलेल्या महिलांमध्ये व्यावसायिक मानसिकता रूजविणे तसे कठिणच.

मशरूम शेतीतून महिला बचत गटाची स्वयंपूर्णतेकडे झेप
लोकमत शुभवर्तमान : आमदार दत्तकर गाव रोंघा येथे परिवर्तनाच्या दिशेने बचत गटाचे कार्य
भंडारा : वर्षानुवर्षे चुल आणि मुल यात गुरफटलेल्या महिलांमध्ये व्यावसायिक मानसिकता रूजविणे तसे कठिणच. परंतु, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा व प्रशासनाची साथ यामुळे आदिवासीबहुल गाव रोंघा येथील महिलांनी मशरूम शेतीच्या माध्यमातून कर्तृत्व सिद्ध केले. विकासाचा मागमुस नसलेल्या रोंघा या गावात मशरूम शेतीमुळे ‘अच्छे दिन’ची सुरूवात झाली आहे.
जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेले १,८८८ लोकवस्तीचे रोंघा हे गाव आदिवासीबहुल आहे. विधान परिषदेचे सदस्य आमदार अनिल सोले यांनी रोंघा या गावाला दत्तक घेतले आहे. या गावात जय मॉ लक्ष्मी बचत गट, प्रगती महिला बचत गट व जिजामाता महिला बचत गट आहे. या गटामध्ये ५० महिलांचा सहभाग आहे.
आमदार अनिल सोले, जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले यांनी या गावात मशरूम शेतीची संकल्पना मांडली. यासाठी आ.सोले यांनी गावात बैठक घेऊन महिलांना आवाहन केले होते. त्यानंतर कृषी विभागाचा आत्मा प्रकल्प व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचतगटांना मशरूम शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. आत्माच्या मार्गदर्शिका डोरले यांनी प्रशिक्षण दिले. परंतु, शेवटच्या प्रशिक्षणापर्यंत केवळ चारच महिलांनी आवड दाखविल्यामुळे त्यांचीच निवड करण्यात आली. जय मॉ लक्ष्मी बचत गटाच्या मंगला नेवारे, भागरथी बोपटे, प्रगती बचत गटाच्या रिना उके, जिजामाता बचत गटाच्या अंतकला राऊत या महिलांचा यात समावेश करण्यात आला. सुरूवातीला त्यांना कोणतेही अनुदान मिळाले नाही. या चारही महिलांनी स्वत:जवळून प्रत्येकी अडीच हजार रूपये गुंतवणूक करून प्रयोगाला सुरूवात केली.
प्रशिक्षणानंतर मशरूम शेतीला प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरपंच विजय परतेकी यांनी समाज मंदिरातील एक खोली महिलांना दिली. या खोलीत १० बाय १५ आकाराचा बांबुचा शेड तयार करण्यात आला. त्यात मशरूमचे दीडशे बेड तयार करण्यात आले. या शेतीसाठी पाण्याची गरज असल्याने मुख्याध्यापक बासोडे यांनी पाण्याची सोय करून दिली. जीवजंतुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेडच्या खाली पोटॉशियम परमॅग्नेट ठेवण्यात येत होता. मशरूमचे बीज टाकल्यानंतर २० व्या दिवशी मशरूमचे कोंब बाहेर येऊ लागले. हे मशरूम परिपक्व झाल्यानंतर मशरूमचा पहिला तोडा करण्यात आला. आतापर्यंत २० किलोचे मशरूम काढण्यात आले आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत मशरूम विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. या गावातील हा पहिला प्रयोग आहे. सुरूवातीला या प्रयोगाबाबत महिलांमध्ये संभ्रम होता. परंतु, पहिला तोडा निघाल्यानंतर या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. दिवसातून केवळ दोन तास या शेतीसाठी द्यावे लागतात. सध्या लहान बाजारपेठेत मशरूमची विक्र ी केली जाणार असून त्यानंतर मोठी बाजारेपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.