हुतात्मा स्मारक भूईसपाट होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:58 IST2017-08-08T23:57:30+5:302017-08-08T23:58:23+5:30
स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती देणाºया तुमसरातील हुतात्मा स्मारकाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे.

हुतात्मा स्मारक भूईसपाट होण्याच्या मार्गावर
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती देणाºया तुमसरातील हुतात्मा स्मारकाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. रक्त सांडवून स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवण्याचे महान कार्य या हुतात्म्यांनी केले होते. ९ आॅगस्ट क्रांतीदिनी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला होता. मागील २५ वर्षापासून हुतात्मा स्मारक दुरुस्तीची प्रतीक्षा असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.
तुमसर शहर सर्वाधिक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा तालुका म्हणून शासनदप्तरी नोंद आहे. तुमसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी हे दोनदा येऊन गेले. मोहाडी व तुमसरचे नाव ब्रिटीशांच्या दप्तरात स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होणारे शहर म्हणून आजही नोंदी आढळतात. दिल्ली तथा मुंबई आणि देशात घडलेल्या ब्रिटीशांच्या विरोधातील घटनेनंतरचे पडसाद या दोन्ही तालुक्यात उमटले होते, हे विशेष. तुमसररोड रेल्वेस्थानक जाळपोळ प्रकरण, मोहाडी येथे रास्ता रोको व तुमसरातील ब्रिटीशांविरोधातील क्रांतीकारी आंदोलनाने दोन्ही शहरे भारताच्या नकाशावर आली होती.
तुमसर शहरात नेहरु क्रीडांगणाजवळ हुतात्मा स्मारक राज्य शासनाने तयार केले. त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. या हुतात्मा स्मारकाची देखभाल कुणी करावी असा प्रश्न पडला आहे. येथील हुतात्मा स्मारकात हुतात्मा भुराजी बालारामजी चाणोरे (बाम्हणी), हुतात्मा श्रीराम रामजी धुर्वे (तुमसर, हुतात्मा राजाराम पैकुजी धुर्वे (तुमसर), हरी काशीनाथ फाये (तुमसर), भदुजी रामाजी लोंदासे (तुमसर), पांडूरंग परसराम सोनवणे (मुंढरी), माधो भुरकू पडोळे (तुमसर), हरी बाबूराव पेंढारकर (तुमसर), हिरालाल संपत मेहर (तुमसर) या हुतात्म्यांची नावे एका दगडावर लिहिली आहेत. हुतात्मा स्मारकाच्या दर्शनी भागावर हुतात्म्यांची नावे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हे सर्व वीजपुरूष २५ ते ४० वर्षांचे होते.
देशप्रेम व ब्रिटीशांना आपल्या देशातून हाकलून लावून स्वातंत्र्याचा सूर्य या हुतात्म्यांनी बघितला नाही. परंतु इतिहासातून हुतात्म्यांचे नाव घेणाºया लोकप्रतिनिधींनी किमान हुतात्मा स्मारकांचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे आहे. प्राणाची आहुती देताना जितके कष्ट या हुतात्म्यांना झाले नसतील तितके कष्ट हुतात्मा स्मारकाला बघून त्यांच्या कुटुंबियांना होत आहेत.
नियोजनाचा अभाव व दुर्लक्षितपणा यामुळे या स्मारकाची ही दुर्दशा झाली आहे. हुतात्मा स्मारकात बांधण्यात आलेल्या उंच मशालीला तडे गेले आहेत. क्रीडांगण असल्याने येथे शालेय विद्यार्थी, क्रीडापटू विश्रांतीकरिता बसतात. ही मशाल धारातिर्थ पडण्याच्या मार्गावर आहे. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तुमसर नगरपरिषदेने पुढाकार घेऊन हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण करण्याची गरज आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात हुतात्मा स्मारकांचा प्रश्न चर्चेला येतो. पुन्हा ते विस्मरणात जातो. कायम स्मरणात राहणाºया हुतात्मांच्या स्मारकाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याकरिता पुढाकार घेण्याची गरज आहे.