बाजारात खुलेआम जुगार, मद्यपान
By Admin | Updated: December 9, 2014 22:44 IST2014-12-09T22:44:23+5:302014-12-09T22:44:23+5:30
शांतताप्रिय शहर अशी ओळख असलेल्या भंडारा शहराची ओळख आता अशांत भंडारा अशी होऊ लागली आहे. मोठ्या बाजारातील गंज बाजाराच्या मागील परिसरात दारुचे अड्डे तर लहान बाजारातील बंद

बाजारात खुलेआम जुगार, मद्यपान
महिलांना सोसावा लागतो नाहक त्रास : दारुड्यांचा भररस्त्यावर धिंगाणा
भंडारा : शांतताप्रिय शहर अशी ओळख असलेल्या भंडारा शहराची ओळख आता अशांत भंडारा अशी होऊ लागली आहे. मोठ्या बाजारातील गंज बाजाराच्या मागील परिसरात दारुचे अड्डे तर लहान बाजारातील बंद प्रसाधनगृहात जुगाराचे अड्डे फुलू लागले आहेत. मागील आठवड्यात पालिकेच्या चाळीत ‘गांजा’चा अड्डा ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर बाजारातील चालत्या-बोलत्या दारु अड्ड्यांचे ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
मोठा बाजार चौकातील धान्य गंजामागील पाण्याच्या टाकीजवळ दारू खुलेआम पिण्याचा प्रकार सुरू आहे. याठिकाणी दारुड्यांसाठी दारुची शिशी, प्लॉस्टिकचे डिस्पोजल ग्लास, पाणी पाऊच आणि नमकीनची व्यवस्था विक्रेत्यांकडून होत आहे. दारु पिणाऱ्यांची याठिकाणी दररोज गर्दी असते. रविवार व बुधवारला आठवडी बाजारात ही गर्दी दुप्पट असते. याच परिसरात महिलांसाठी प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे. परंतु, याठिकाणी इतकी घाण पसरली आहे. आणि या परिसरात मद्यपिंचा धिंगाना सुरू राहतो. मद्यपिंकडून धोका होऊ शकतो, या भीतीमुळे त्याठिकाणी जाण्याची कुणी हिंमत करीत नाहीत. त्याठिकाणी कुठलिही सुरक्षा नाही.
अतिक्रमणधारकाची मनमानी
याचठिकाणी एका दुकानदाराने आपले दुकान रस्त्यावर आणून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे भाजी बाजारात भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या दुकानदाराच्या मनमानीमुळे शेतकरीही धास्तावले आहेत.
लहान बाजारात सुरु असतो
जुगाराचा अड्डा
लहान बाजार परिसरातील भाजी बाजारात पालिकेने महिला आणि पुरुषांसाठी प्रसाधनगृह बांधले आहे. त्यानंतर या प्रसाधनगृहाचे कंत्राट देण्यात आले आहे. परंतु, महिला प्रसाधनगृह बांधण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत ते सुरु झालेले नाही. या प्रसाधनगृहाच्या दारावरच सकाळी ९ वाजतापासून रात्री १० वाजेपर्यंत जुगाराचा अड्डा भरतो.
बाजारात येणाऱ्या महिलांना प्रसाधनगृहाअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जुगार खेळणारे पिऊन असल्यामुळे त्यांच्यातली भांडणे रोजची झाली आहेत. भंडाऱ्याचे पोलीस प्रशासन करते तरी कां? असा प्रश्न असता शहरातील सामाजिक संघटनाही मूकदर्शक बनल्या आहेत कां? (लोकमत चमू)