बाजारातील मद्यपींचा अड्डा गायब
By Admin | Updated: December 10, 2014 22:52 IST2014-12-10T22:52:09+5:302014-12-10T22:52:09+5:30
मोठा बाजारात खुलेआम मद्यपान तर लहान बाजारात जुगार या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच पोलीस प्रशासन खळबडून जागे झाले. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आलेली आहे.

बाजारातील मद्यपींचा अड्डा गायब
बाजारात शांतता : पोलीस अधीक्षकांनी वाढविली गस्ती पथकाची संख्या
भंडारा : मोठा बाजारात खुलेआम मद्यपान तर लहान बाजारात जुगार या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच पोलीस प्रशासन खळबडून जागे झाले. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आलेली आहे. दरम्यान, सायंकाळच्या वेळी मद्य पिण्यासाठी आलेल्या काही मद्यपिंच्या कानशिलावर पोलिसांचा पंजा पडल्यामुळे या परिसरात वातावरण सुनेसुने झाले आहे.
मोठा बाजार चौकातील धान्य गंजामागील पाण्याच्या टाकीजवळ दारू खुलेआम पिण्याचा प्रकार सुरू होता. याठिकाणी मद्यपिंसाठी दारुची शिशी, प्लॉस्टिकचे ग्लास, पाणी पाऊच आणि नमकीनची व्यवस्था भुरट्या विक्रेत्यांकडून सुरू होती. हा प्रकार लोकमत चमूने ‘स्टिंग आॅपरेशन’ करुन उघडकीस आणला होता. दरवेळी बुधवारला आठवडी बाजारात गर्दी दुप्पट असते. परंतु आज वृत्त प्रकाशित झाल्यानंतर या परिसरातील गर्दी दिसेनासी झाली आहे. याच परिसरात महिलांसाठी प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे. परंतु, याठिकाणी मद्यपिंचा धिंगाना सुरू असल्यामुळे चांगले ठिकाण धोकादायक स्थळ बनले होते. मद्यपिंच्या भीतीमुळे त्याठिकाणी जाण्याची कुणी हिंमत करीत नव्हते. आज पोलिसांची गस्त वाढविण्यात आल्यामुळे महिला आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
जुगारही भरला नाही
लहान बाजार परिसरातील भाजी बाजारात पालिकेने महिला आणि पुरुषांसाठी प्रसाधनगृह बांधले आहे. या प्रसाधनगृहाचे कंत्राट देण्यात आले असले तरी ते महिला प्रसाधनगृह बांधले तेव्हापासून आतापर्यंत सुरु झाले नाही. या प्रसाधनगृहाच्या दारासमोरच सकाळी ९ वाजतापासून रात्री १० वाजेपर्यंत जुगाराचा अड्डा भरत होता. पोलिसांच्या भीतीमुळे आज हा जुगार अड्डासुद्धा भरला नाही. हे ठिकाणही सुनेसुने होते. याशिवाय दररोजची मद्यपिंची भांडणेही झाली नाहीत. (लोकमत चमू)