बाजार समिती निवडणुकीचा घोडेबाजार तेजीत
By Admin | Updated: September 4, 2015 00:13 IST2015-09-04T00:13:22+5:302015-09-04T00:13:22+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत रंगत आली असून ६ सप्टेंबरला मतदान होणार आहे.

बाजार समिती निवडणुकीचा घोडेबाजार तेजीत
लाखनी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत रंगत आली असून ६ सप्टेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारांची मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्याची धडपड सुरु झाली आहे. लाखनी व साकोली तालुक्यातील कार्यक्षेत्र असलेली स्थानिक बाजार समितीची निवडणूक म्हणजे दोन्ही तालुक्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
संचालक मंडळाच्या निवडणुकीत तीन पॅनेल आमोरासमोर आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विजयानंतर माजी आमदार सेवक वाघाये यांनी काँग्रेसप्रणित शेतकरी पॅनल तयार केली आहे. भाजपा व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेली शेतकरी विकास पॅनल बाजार समितीचे माजी सभापती शिवराम गिऱ्हेपुंजे यांच्या नेतृत्वात लढत आहे. अपक्ष उमेदवारांनी किसान परिवर्तन पॅनेल ही तिसरी आघाडी तयार केली आहे.
सेवा सहकारी संस्था गटातून ११ उमेदवार, ग्रामपंचायत गटातून ४ उमेदवार, व्यापारी गटातून २, पणन प्रक्रिया गटातून १, हमाल तोलारी गटातून १ उमेदवारांना विजयी करावयाचे आहे. काँग्रेसप्रणित पॅनलचे सेवा सहकारी गटातून सर्वसाधारण उमेदवार उमराव आठोडे, जगन्नाथ राहांगडाले, ब्रिजलाल समरित, ओमप्र्रकाश वाढई, नितीन ठवकर, सुधाकर फंदे, अशोक लिचडे, एन. टी. प्रवर्गातून प्रेमलाल मेश्राम, महिला प्रतिनिधी रेखा समरीत कमलबाई कमाने, ओबीसी प्रवर्गातून रामकृष्ण वाढई व शेतकरी विकास पॅनलकडून शिवराम गिऱ्हेपुंजे, सुरेश कापगते, सतिश समरीत, अशोक चोले, महेश पटले, केशव मांडवटकर, वसंता शेळके, महिला गट पुष्पा गिऱ्हेपुंजे, वनिता तरोणे, ओबीसी गट विजय खोब्रागडे, एन. टी. गटातून सोमा मांढरे, अपक्ष पॅनेलकडून अंगराज समरीत, सुखदेव तरोणे, शैलेश गजभिये, कैलाश गेडाम, भागवत नागलवाडे, गोपाल आगाशे, केदार बडवाईक, भिमराव सयाम रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत गटात काँग्रेसकडून हेमंतकुमार सेलोकर, चुन्नीलाल बोरक, नाजूक भैसारे, अनमोल काळे, भाजपा राकॉ कडून रामचंद्र कोहळे, श्याम शिवणकर, करुणा वालोदे, पद्माकर बावणकर अपक्ष पॅनेलकडून पतीराम समरीत, लक्ष्मी परसगडे, सुनिल चाफले निवडणूक लढवित आहेत.
व्यापारी गटात काँग्रेसकडून खिरोज गायधनी, गणेश लुटे भाजपाराकॉकडून घनश्याम खेडीकर, खुशाल पाखमोडे यांचा लढत आहे. पणनप्रक्रिया गटात विजय वाघाये यांच्याविरुध्द मनिष कापगते यांच्यात लढत आहे. अपक्ष उमेदवार कुंवरलाल बागडे रिंगणात आहेत. हमाल तोलारी गटात तेजराम मेश्राम यांच्याविरुध्द मनोहर जांभुळकर यांच्यात लढत आहे.
यापूर्वी भाजपाचे संचालक मंडळ सत्तेवर होते. जुने संचालक मंडळ काही नव्या चेहऱ्यासह पुन्हा निवडणूक लढवित आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने भक्कम पाठींबा दिला आहे. तिन्ही पॅनचे उमेदवार सभासदांच्या घरापर्यंत पोहचत आहे.
या निवडणुकीत कोट्यवधी रुपयाची उधळण होत असल्यामुळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सदस्य व ग्रामपंचायतच्या सदस्यांची दिवाळी सुरू आहे. मागणी न करतानीही गरज पूर्ण होत असल्याने मतदार जाम खुष आहेत. सर्वसामान्य लोकांचा या निवडणुकीशी संबंध नसला तरी प्रत्येक शेतकऱ्यांची नाळ बाजार समितीशी जुळलेली आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष बाजार समितीच्या निवडणुकीकडे आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या बाजार समितीची सत्ता मिळावी, यासाठी घोडेबाजार वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)