रमजान ईदसाठी सजला शहरात बाजार
By Admin | Updated: July 13, 2015 00:49 IST2015-07-13T00:49:13+5:302015-07-13T00:49:13+5:30
रमजान ईद अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये तयारीची लगबग सुरू झाली आहे.

रमजान ईदसाठी सजला शहरात बाजार
सेवई व खजूरसह अन्य पदार्थांची रेलचेल : खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी
भंडारा: रमजान ईद अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये तयारीची लगबग सुरू झाली आहे. शहरातही ईदेचा बाजार सजला आहे. शेवया, घिवर, फेण्या, खजूर आणि तत्सम साहित्याची दुकाने सजली आहेत. मुस्लीम बांधव सहकुटुंब बाजारात जाऊन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.
मानवी जीवनातील धार्मिक श्रद्धा व परंपरांना विवेकी विचारांची जोड देऊनच पूर्वजांनी अनेक पूजा विधींची निर्मिती केली. यातील अनेक परंपरा आजही मानवाच्या प्रगतीला पोषकच ठरल्याचे दिसून येतात. सर्वधर्मसमभावाची कास धरणाऱ्या या देशात इस्लाम धर्मीर्यांनी देखील हीच विवेकाची परंपरा सुरू ठेवली. रमजान महिन्याच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. रोजा म्हणजे मराठी भाषेत उपवास होय. रोजा हा शारीरिक, मानसिक व आत्मशुद्धीसाठी उपयुक्त असतो. दिवसभर काहीही सेवन न करता उपवास केल्याने शरीरातील उष्णता वाढून मेद धातूचे पचन होते. त्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी होऊन शरीरशुद्धी होण्यास मदत मिळते. महिनाभर रोजा, नमाज व जकात अदा केल्यास काया, वाचा व मनइंद्रिये शुद्ध होऊन पवित्रता लाभते. मानवातील चांगल्या गुणांची वृद्धी होऊन जीवन यशस्वी होते. म्हणूनच इस्लाममध्ये रोजाला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे. रोजाच्या काळात सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत खान-पान, चुकीच्या गोष्टी ऐकणे, पाहणे आदी धर्मबाह्य मानले जातात. एका अर्थाने आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लीमबांधव व्रतबंधन पाळतात. रमजान महिन्यातील २४ तासांचा प्रत्येक दिवस जणू प्रशिक्षणच असल्याचे मानले जाते. त्यानंतर नमाज फजर, जोहर व असरनंतर मागरिब केला जातो. त्यानंतरच रोजा सोडतात. ईशा आणि तराबीची नमाजही पठण करतात. सात वषार्पासून तर वयोवृद्धापर्यंत हा रोजा केला जातो. रोजा सोडणाऱ्याकरिता मस्जिद परिसरात विविध समित्यांकडून सोईसुविधा उपलब्ध करून दिले जाते. घरोघरी कुराणाचे पठणही होते. (नगर प्रतिनिधी)