चुकीच्या उपचाराने विवाहितेचा गर्भपात

By Admin | Updated: May 4, 2017 00:24 IST2017-05-04T00:24:26+5:302017-05-04T00:24:26+5:30

तालुक्यातील नान्होरी दिघोरी येथील एका विवाहित महिलेच्या संमतीविना स्त्रीरोग तज्ञ नसलेल्या ..

Marital miscarriage with wrong treatment | चुकीच्या उपचाराने विवाहितेचा गर्भपात

चुकीच्या उपचाराने विवाहितेचा गर्भपात

नान्होरी येथील घटना : डॉक्टर, पती व सासूविरूद्ध पोलिसात तक्रार
लाखनी : तालुक्यातील नान्होरी दिघोरी येथील एका विवाहित महिलेच्या संमतीविना स्त्रीरोग तज्ञ नसलेल्या आयुर्वेदिक डॉक्टराने पती व सासूच्या संगनमताने चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने त्या विवाहीतेचा गर्भपात झाला. संबंधीतावर कारवाईसाठी या आशयाची तक्रार खुद्द विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
गोविंदा पाल रा. नान्होरी यांचा मुलगा दत्तू पाल याचा विवाह तीन वर्षापुर्वी भिकारमिन्सी येथील रहिवासी असलेल्या अरुण निरगुळे यांच्या कन्येशी झाला. विवाहानंतरचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर त्यांना एक कन्या झाली. त्यानंतर सदर विवाहितेला माहेरून सोन्याची गोफ आणावी यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू झाले.
विवाहितेला जानेवारी २०१७ मध्ये शारीरिक अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे ७ मार्च रोजी सासूचे सांगण्यावरून महिलेच्या पतीने तिला मुरमाडी तुपकर येथील डॉ.जवंजार यांच्या क्लिनीकमध्ये नेले. होत असलेल्या त्रासाबाबत डॉक्टरला सांगितल्यावर आपण गरोदर असू शकता, याची चाचपणी करावी, असे सांगितले. औषधाच्या दुकानातून एक किट मागून गरोदरपणाची चाचणी केली असता दोन महिन्यांचा गर्भ असल्याचे निष्पन्न झाले. गर्भवती असल्याचे सांगून काही महिलेला औषधे दिली.
घरी गेल्यावर जेवन झाल्यानंतर डॉक्टरानी दिलेल्या गोळया पतीने खाण्यास दिल्या. एकाच प्रकारच्या चारही गोळ्या असल्यामुळे मला संशय आला त्यामुळे मी औषध खाण्यास नकार दिला, असे पिडीत विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केलेल्या तक्रारीत नमुद केले आहे. मात्र पतीने मारझोड करून जबरदस्तीने औषध खाण्यास बाध्य केले. तसेच औषध खाल्ल्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला. यातच महिलेचा गर्भपात झाला. चार दिवसानंतर याबाबत सदर महिला तक्रार देण्यासाठी लाखनी पोलिस ठाण्यात गेली असता बिट अंमलदाराने डॉक्टर व तिच्या पतीबरोबर भ्रमणध्वनीवरून संपर्क करून दोन महिन्याचा गर्भपात होवूच शकत नाही, असे पिडीतेला सांगून तक्रार घेण्यास नकार दिला. यामुळे डॉक्टर, विवाहितेचा पती यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण होवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे पिडीत विवाहितेचे म्हणणे आहे. अत्याधिक रक्तस्त्राव झाल्याने पुन्हा शारीरिक कमजोरी वाटू लागल्याने घरची कामे करणे कठीण झाले. त्यामुळे सध्या ही महिला माहेरी राहत आहे. मला कसल्याही प्रकारची माहिती न देता चुकीच्या व सक्तीच्या उपचारामुळे माझा गर्भपात झाला आहे, व याची पोलीसात तक्रार होणार आहे, याची माहित डॉक्टरला होताच पिडीत महिलेच्या वडीलांशी मोबाईलवर संपर्क करून तथा महिलेच्या माहेरी येवून तक्रार न देण्यासाठी पैशाचे आमिष दाखविले., असा आरोपही पिडीतेने केला आहे. डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचाराने गर्भपात झाल्याचे स्पष्ट होते. परिणामी सबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पिडीत महिलेने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. (शहर प्रतिनिधी)

सदर विवाहित महिला माझ्याकडे पतीसह उपचारासाठी आली होती. अशक्तपणामुळे गरोदर असल्याची शंका आल्याने प्रेगनन्सी टेस्ट केली. महिला गर्भवती असल्याचे आढळून आले. मी तिच्यावर उपचार केला नाही. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात येण्याचा सल्ला दिला पण ती आली नाही.
-डॉ. प्रमोद जवंजार. मुरमाडी

Web Title: Marital miscarriage with wrong treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.