करडी परिसरात अतिवृष्टीचा अनेक घरांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:47 IST2018-08-22T21:47:34+5:302018-08-22T21:47:51+5:30
मागील दोन दिवसांपासून करडी व पालोरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. भिंती कोसळल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

करडी परिसरात अतिवृष्टीचा अनेक घरांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मागील दोन दिवसांपासून करडी व पालोरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. भिंती कोसळल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोहाडी तालुक्यातील केसलवाडा येथे भागरथा देवाजी शेंदरे (६०), पालोरा येथील शांताबाई सुखदेव भोयर (६२), गंगाबाई येबल हलमारे (६५) तर जांभोरा येथील बयनाबाई विठोबा मुंगमोडे यांचे संपूर्ण घर क्षतीग्रस्त झाले. याप्रकरणी महसुल विभागाने नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे. करडी परिसरात २० आॅगस्ट रोजी सुमारे ७६ टक्के पावसाची नोंद झाली. तलाव, नदी, नाले, ओव्हरफलो झाले. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. केसलवाडा येथील भागरथा शेंदरे तर जांभोरा येथील बयनाबाई मुंगमोडे यांचे मातीचे कौलारु घर कोसळल्याने त्यांच्यासमोर राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. माती व कौलांसह फाटे पडल्याने मातीत भांडे दबल्या गेले.
पालोरा येथील शांताबाई भोयर यांचे घर पावसामुळे जमीनदोस्त झाले तसेच गंगाबाई हलमारे यांच्याही घराचे नुकसान झाले. प्रकरणी तलाठ्यांना माहिती देण्यात आली असून पंचनामा करण्यात आला. आपादग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई व घरकुल देण्यात यावे, अशी मागणी पालोरा येथील सरपंच महादेव बुरडे, सदस्य भोजराम तिजारे, जांभोराचे सरपंच भुपेंद्र पवनकर तर केसलवाडाचे सरपंच सुनिता हातझाडे यांनी केली आहे.