अनेक नागरिकांना अतिवृष्टीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:18 IST2017-08-10T00:17:32+5:302017-08-10T00:18:49+5:30
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कुठे संततधार तर कुठे अतिवृष्टीसह हजेरी लावली.

अनेक नागरिकांना अतिवृष्टीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कुठे संततधार तर कुठे अतिवृष्टीसह हजेरी लावली. यामुळे मागील अनेक दिवसांपासून खोळंबलेल्या रोवणीला गती मिळाली आहे. पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने या तालुक्यासह लाखांदूर तालुक्यातील काही शेतबांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने सर्वत्र जलमय स्थिती दिसून येत आहे. अनेकांना आर्थिक फटका बसला असून अनेक ठिकाणच्या घरांची पडझड झाली आहे. सध्या पाऊस ओसरल्याने परिस्थिती पुर्ववत होत आहे.
लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी
लाखांदूर : सतत दोन दिवस पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यात अतिवृष्टी झाली. तालुक्यातील विरली येथे ४३.६ मि.मी., मासळ १९५, बारव्हा १९४, लाखांदूर १२४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. चौरास भागात नाले ओसंडून वाहत आहेत. धान शेती पाण्याखाली आली तर पाऊलदवना येथील काही घरे पाण्याखाली आल्याची माहिती लाखांदूर तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे. तालुक्यातील मासळ भागात मात्र अतिवृष्टी झाल्याने अनेक घरे पाण्याखाली आली आहे. शेती पाण्याखाली आली. किन्ही, गुंजेवार मार्गावरील पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली. येत्या दोन दिवस अशीच परिस्थिती राहिली तर धानपिक सडल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची भिती वर्तवली जात आहे. सतत मुसळधार पाऊस पण रस्त्याच्या कडेला पाणी वाहून नेणाºया नाल्या नसल्याने येथील रस्ते जलमय झाले आहेत. टी पाईन्ट परिसर, नगरपंचायत गाडे, पंचायत समिती परिसरातील रस्ते, अनेक वॉर्डातील पाणी निघत नसल्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाले असून चिखलामुळे येथील नागरिक व दुकानदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मासळ परिसरात ११५ मि.मी. पावसाची नोंद
मासळ : सोमवार दुपारपासून सुरू झालेला पाऊस आज अखेर बुधवारला दुपारी १२ वाजतापासून थांबल्याने शेतकºयांसह सामान्य जनतेनी सुटकेचा निश्व:स घेतला. मात्र काल दुपारनंतर रात्रभर पावसाने अधिक जोर धरल्याने नदीनाले व शेतातील जलस्तर पुन्हा वाढला. आज सकाळपर्यंत मासळमध्ये १९५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. परंतु दुपारी १२ वाजेनंतर पाऊस थांबल्याने नदी नाल्यांचा जलस्तर झपाट्याने कमी होताना दिसत आहे. आज दिवसभर भंडारा, मासळ, लाखांदूर, गडचिरोलीकडे जाणाºया बसफेºया ढोलसर रस्त्यावरील पुलावर पाणी असल्याने बंद होत्या. मात्र सायंकाळी स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मासळ शेजारील बाचेवाडी मार्ग, ब्रम्ही मार्ग तसेच घोडेझरी किटाडी मार्गावरील जलस्तर कमी झाल्याने पुदपारी तुरळक वाहतुक सुरू झाली. मात्र शेतातील पाणी कमी होण्यास अजून दोन ते तीन तास लागण्याची शक्यता आहे.दरम्यान काल बेलाटी भावड मार्गावर अत्री भावडच्या मध्ये असलेल्या नाल्यावरील पुरात संजय बाबुराव खंगार या शिक्षकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. आज. सकाळी ९ वाजता त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. शेतातील जलस्तर कमी होताच रावेणी कामे जोमाने सुरू करण्यास शेतकरी वर्ग उत्सुक आहे.
कालच्या अतिवृष्टीमुळे मासळ येथील विद्याधर हेमणे, गिता बंडू राऊत यांच्यासह किमान चार ते पाच घरांचे नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अतिवृष्टीमुळे खैरी, घरतोडा, सरांडी/बु., ढोलसर, ब्रम्ही, बेलाटी, बाचेवाडी, पालेपेंढरी, घोडेझरी, सोनेगाव आदी गावातील शाळकरी मुलांच्या उपस्थितीवर परिणाम झाला. विद्यार्थ्यांनी जणू अघोषित सुट्टीच मारली. तुर्त पाऊस थांबल्याने परिसरातील जनजीवन पुर्वपदावर येत आहे.
संततधार पावसाने शेतशिवार जलमय
विरली (बु.) : संततधार पावसाने संपूर्ण शेतशिवार जलमय झाले असून शेताना तलावाचे स्वरूप आले आहे. परिणामी खोळंबलेले रोवणी सुरू झाले आहेत. मात्र ज्या शेतकºयांनी जीवाचा आटापीटा करून कसेबसे रोवणे आटोपले त्यांचे रोवणे आता वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. या पावसामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तब्बल १५-२० दिवसानंतर वरूणराजाच्या दमदार आगमनामुळे मरणासन्न धानपिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकरी सुखावला. पावसाअभावी खोळंबलेले रोवणे सुरू झाले. रोवणीच्या कामाला पुन्हा गती आली. मात्र ज्या शेतकºयांनी जीवाचे रान करून आपल्या शेतीला पाणीपुरवठा करून कसेबसे रावेणे आटोपले होते. त्या शेतकºयांचे नुकतेच झालेले रोवणे या संततधार पावसामुळे वाहुन जाण्याच्या, सडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या शेतकºयांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. या संततधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून शेतात साचलेले पाणी निघणे दुरापास्त झाले आहे. परिणामी धानपीक सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पावसामुळे स्थानिक जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेत पुराचे पाणी शिरल्यामुळे शाळेचा परिसर जलमय झाला आहे. परिणामी आज बुधवारला शाळेला सुट्टी देऊन शाळा बंद ठेवण्यात आली. सदर शाळेच्या बाजूनेच एक नाला वाहत असून या नाल्याचे पाणी शाळेच्या परिसरात शिरल्याने शालेय परिसर जलमय झाला आहे. शाळेच्या पटांगणात एका कोपºयात असलेल्या बोडीमुळे या पुरपरिस्थितीने अधिकच गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीने जनजीवनावर विपरित परिणाम
पालांदूर : देवाजीच्या आले मना तिथे कुणाची चालेना म्हणतात ते खरे आहे. लाखनी तालुक्यात केवळ पालांदूर परिसरात जोरदार पाऊस होऊन अख्या तालुका कोरडा आहे. सोमवारला ५६.६ मि.मी. तर मंगळवारला २१०.६ मि.मी. पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला असून खोळंबलेल्या रोवणीला गती मिळाली आहे. तहसीलदार राजीव शक्करवार व नायब तहसीलदार विनोद थोरवे यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांची चौकशी केली.
पंधरा दिवसापासून थांगपत्ता नसलेल्या पावसाचा दोन दिवसापासून मुक्काम असल्याने श्रावणमासाचा आनंद द्विगुणीत व्हायला मदत झाली. बळीराजासुद्धा मनोमन सुखावला असून रोवणीकरिता सरसावला आहे. तर सिंचित झालेल्या रोवणीला खत द्यायला अडचण झाली नाही. उष्णतेने कहर केल्याने खरीप हंगाम धोक्यात आला होता. धानपिक पिवळे पडले होते. रोवणी खोळंबली होती. आता शेतकरी कामाला लागला असून १५ आॅगस्टपर्यंत रोवणी पूर्णत्वाकडे जायला अडचण नाही. तई व ढिवरखेडा पुलावर पाणी असून वाहतूक प्रभावित झाली आहे.
पालांदूर पोलीस स्टेशन समोरील केवळराम मेश्राम यांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याची नुकसान झाले. दिवसरात्र पावसामुळे मेश्राम कुटूंबाची वाताहत झाली. तहसीलदार राजीव शक्करवार, नायब तहसीलदार विनोद थोरवे यांनी मोठ्या आस्थेने चौकशी करीत लहान तानुल्याची काळजी घेण्याचे सांगितले.
केवळराम यांची सून व तानुल्याची रात्रभर झोप न झाल्याने प्रकृती ठिक नव्हती. मेश्राम परिवारास लहानशा घरात सात व्यक्तींचे राहणे आहे. ग्रामपंचायतकडे त्यांनी घरकुलची मागणी केली परंतू लाभ मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे बांधानातून पाणी वाहत आहे. ढगाळ वातावरण असून पाऊस आणखी येण्याची चिन्हे दिसत असल्याने अशावेळी पोलिसांनी सतर्क राहत वेळीच काळजी घेण्याचे आवाहन केले.
औषधीसाठा कर्मचारीगण, रुग्णवाहिका, इमारत याबाबत माहिती घेत रुग्णसेवा जाणून घेतली. ढगाळ वातावरण, पुरपाणी यातून साथीच्या रोगांची उत्पत्ती होत असते तेव्हा काळजी घेत संपर्कात राहण्याचे सुचविले. कर्मचाºयांची कमतरता, सुसज्ज इमारत आजही रुग्णांना होणाºया त्रासाची माहिती उपस्थितांनी दिली.
१८ कुटुंब प्रभावित
पवनी : संततधार पावसामुळे वेगवेगळ्या गावातील १८ कुटुंब प्रभावित झाली. कित्येकांच्या घरांची पडझड झाली तर काही घरांचे आजुबाजुला पाणी साचल्याने कुटुंबाची इतरत्र व्यवस्था प्रशासनाने केलेली होती. अड्याळ येथे सर्वाधिक १६७.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. कोंढा १५९.५, आसगाव ११२.३, चिचाळ १०, पवनी ६०.५, आमगाव ९१.३ मि.मी. याप्रमाणे पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. आसगाव येथील सात कुटुंबांची, कोंढा येथील तीन, भुयार एक, पवनी एक, अड्याळ तीन, कुर्झा दोन पाथरी एक अशाप्रकारे घरांची पडझड झाली. त्या घरांचे नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सुचना तहसीलदार गजानन कोकड्डे यांनी दिलेल्या आहेत.