एका कुटुंबाच्या वास्तव्याचे ‘मंडेकसा’ गाव...
By Admin | Updated: March 4, 2017 00:25 IST2017-03-04T00:25:16+5:302017-03-04T00:25:16+5:30
एक आटपाटनगर होते, त्या नगराच्या सभोवताल जंगल होते, त्या जंगलाजवळ नवरा-बायको दोन पोरांसोबत राहत होते.

एका कुटुंबाच्या वास्तव्याचे ‘मंडेकसा’ गाव...
हिंस्र श्वापदांच्या सानिध्यात चौघे कंठतात जीवन : तुमसर तालुक्यातील सोरना गट ग्रामपंचायतीतील प्रकार
प्रशांत देसाई भंडारा
एक आटपाटनगर होते, त्या नगराच्या सभोवताल जंगल होते, त्या जंगलाजवळ नवरा-बायको दोन पोरांसोबत राहत होते. जंगल असल्याने त्यांच्या घराजवळ दररोज वाघ, हरीण, बिबट, ससे असे प्राणी येत होते. परंतु ते त्यांना न भीता राहत होते, अशा आशयाच्या दंतकथा लहानपणी खूप ऐकल्या. परंतु आता वास्तवात या कथानकानुसार एखादे कुटुंब जंगलाच्या सानिध्यात राहते, असे म्हटल्यास त्यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे.
तुमसर तालुक्यातील सोरना ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंडेकसा या गावाची सध्याची स्थिती एखाद्या चित्रपट किंवा दंतकथेप्रमाणेच आहे. अवतारसिंग लखनसिंग मडावी यांचे याच गावात वास्तव्य आहे. अवतारसिंग हे पत्नी मंगला व साहिल व किशोर या दोन मुलांसह जंगलाच्या मधोमध असलेल्या शेतात कौलारू घर बांधून राहत आहेत.
एका गावात केवळ एक कुटुंब वास्तव्याला राहणे ही आकलनापलिकडील बाब असली तरी हे सत्य आहे. घनदाट जंगलाच्या सानिध्यात पती-पत्नी व दोन चिमुकल्यांसह अवतारसिंग मडावी संसारात मग्न आहेत. अवतारसिंगचे पूर्वजांचे येथे वास्तव्य होते. त्यांचा भाऊही येथे राहत होते. मात्र, एका कुटुंबासह राहत असताना हिंस्त्र श्वापदांपासून जीवाला होणारा संभाव्य धोका व सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्यांनी गाव सोडले. भाऊ आता गोवारी टोला येथे राहतात. अवतारसिंग यांची दोन्ही मुले पिटेसूर येथील शाळेत शिकतात. दोघांनाही ते रोज सकाळी शाळेत सोडतात व सायंकाळी नित्यनेमाने आणायला जातात. दरम्यानच्या काळात पती-पत्नी शेतात राबतात. वर्षाला चांगले उत्पादन घेऊन समाधानकारक जीवन जगत आहेत. एका कुटुंबाचे गाव असल्याने त्यांना शौचासाठी जाण्यासाठी पूर्णपणे मोकळीक होती. कुठेही शौचक्रिया उरकल्यास त्यांना बोलणारे कुणीही नव्हते. जागाही मुबलक असल्याने तसे शौचालय बांधण्याची गरज नव्हती. मात्र, अवतारसिंगने शेतातील घरासमोर शौचालय बांधण्याला प्रारंभ केला आणि सर्वाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. अवतारसिंगने या बाबीला डोळेझाक करून शेतातील घरासमोर त्यांनी एक शौचालय बांधकाम करण्याला प्रारंभ केले असून बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असूनही शौचालय बांधकामासाठी जे टाळाटाळ करतात किंवा ते बांधूनही त्याचा वापर करीत नाही, अशांसाठी अवतारसिंगने केलेले स्वच्छतेचे कार्य ही एक चपराक आहे.
मातीचे उपकार फेडण्यासाठी करतात शेती.....
मंडेकसा या गावात आई-वडीलांनी बांधलेल्या घरात जन्मलेल्या व गावातील मातीत खेळून लहानाचा मोठा झालेल्या अवतारसिंगने गाव सोडले नाही. ज्या मातीने घडविले, त्या घराचे, मातीचे किंबहूना गावाचे उपकार आयुष्यात विसरणार नाही. ज्यांच्यामुळे हे जग बघायला मिळाले, त्यांना सोडणे म्हणजे आयुष्याशी गद्दारी करण्याचा प्रकार असल्याचे अवतारसिंग यांचे म्हणणे आहे. मातीचे उपकार फेडण्यासाठीच गावात राहून शेती करून कुटुंबाचा गाडा चालवित आहे. हाताला काम मिळावे म्हणून अनेक जण गाव सोडून बाहेरगावी जातात. त्यानंतर ते गावाकडे फिरकत नाहीत, अशांसाठी अवतारसिंग यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
अवतारसिंग हागणदारीमुक्तीचा ‘आयकॉन’
हागणदारीमुक्तीची चळवळ सर्वत्र उभी झालेली आहे. अवतारसिंगचे नाव शौचालय बांधकामाच्या यादीत आल्याने सरपंच ग्यानीराम शेंडे, उपसरपंच सुधीर डोंगरे, ग्रामसेवक मंगेश शेरकी यांनी त्यांना शौचालयाचे महत्व सांगितले. त्यानंतर स्वच्छता मिशन कक्षाचे राजेश्वर येरणे, पल्लवी तिडके, शशिकांत घोडीचोर, वर्षा दहीकर यांनी शौचालयाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर अवतारसिंगने शौचालयाचे बांधकाम सुरू केले. अनेक कारण पुढे करून शौचालयाला फाटा देणाऱ्यांसाठी अवतारसिंग यांचे कुटुंबच समाजासाठी ‘आयकॉन’ ठरावे, असा त्यांनी घेतलेला पुढाकार आहे.