तीन डॉक्टरांविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा
By Admin | Updated: May 18, 2014 23:20 IST2014-05-18T23:20:30+5:302014-05-18T23:20:30+5:30
पिंडकेपार येथे एका खाजगी दवाखान्यात अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्युप्रकरणी साकोली पोलीसांनी डॉ. वसंता बाळबुद्धे, डॉ. चैतराम बघेले व डॉ. बाला या तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा...

तीन डॉक्टरांविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा
साकोली : पिंडकेपार येथे एका खाजगी दवाखान्यात अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्युप्रकरणी साकोली पोलीसांनी डॉ. वसंता बाळबुद्धे, डॉ. चैतराम बघेले व डॉ. बाला या तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल केले आहे. डॉ. वसंता बाळबुद्धे, डॉ. चैतराम बघेले यांना अटक करण्यात आले असून डॉ. बाला फरार आहे. पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्या माहितीनुसार दि. १६ मे रोजी दहेगाव, ता. किरणापूर (जि.बालाघाट) येथील एक अल्पवयीन मुलगी ही मामासोबत डॉ. बाला रा. सावली (जि.गोंदिया) येथे गर्भपात करण्यासाठी गेली. येथे उपचार करीत असतानी काही अडचणी आल्यामुळे दुपारी चार वाजतादरम्यान डॉ. बाला यांच्या सांगण्यावरुन ती मुलगी, मुलीचा मामा रामु वाघाडे व डॉ. बाला हे साकोली येथे आले. साकोली येथे आल्यानंतर डॉ. बाला यांनी मामा वाघाडे यांना साकोली येथे थांबवून मुलीला घेऊन डॉ. बाला हे पिंडकेपार येथे डॉ.बाळबुद्धे यांच्याकडे गेले. रात्रीला डॉ. बाळबुद्धे, डॉ. बघेले व डॉ.बाला यांनी त्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्या मुलीचा डॉ. बाळबुद्धे यांच्या दवाखान्यातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर डॉ. बघेले रा.खैरलांजी, डॉ. बाला व मुलीचा मामा वाघाडे हे तिघेही जण पहाटेच्या सुमारास तिथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलगी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी साकोली येथून भंडारा येथे हलविले. तपासाअंती रात्री मुलीच्या मामाला ताब्यात घेतले. आज सकाळी डॉ. बघेले याला ताब्यात घेतले. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, पीआय भगवान खारतोडे व सहकारी करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)