गणेशोत्सवातून लोकचळवळ निर्माण व्हावी
By Admin | Updated: September 27, 2015 00:29 IST2015-09-27T00:29:13+5:302015-09-27T00:29:13+5:30
गणेशोत्सवातून मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मंडळांकडून राबविले जाणारे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरावे.

गणेशोत्सवातून लोकचळवळ निर्माण व्हावी
नाना पटोले यांचे प्रतिपादन
लोकनाथ गिऱ्हेपुंजे भंडारा भूषण पुरस्काराने सन्मानित
भंडारा : गणेशोत्सवातून मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मंडळांकडून राबविले जाणारे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरावे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात लोकचळवळीसाठी केली होती. त्याचे अनुकरण करुन गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासावा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
भंडाऱ्याचा राजा गणेश मंडळाच्यावतीने शनिवारला ‘भंडारा भूषण’ २०१५ या पहिल्या पुरस्काराचे वितरण समारंभात ते बोलत होते. या पुरस्कार वितरण समारंभात नगराध्यक्ष बाबूराव बागडे, आमदार रामचंद्र अवसरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, अर्बन बँकेचे संचालक धनंजय दलाल, तहसीलदार सुनील बन्सोड, मंडळाचे अध्यक्ष अजय वंजारी, मुकेश थानथराटे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल मेंढे मंचावर उपस्थित होते.
यावेळी ‘भंडारा भूषण’ पुरस्कार जिल्ह्यातील पहिले एमबीबीएस पदवीप्राप्त ८६ वर्षीय डॉ.लोकनाथ गिऱ्हेपुंजे यांना प्रदान करण्यात आला. शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ११ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी खा. पटोले म्हणाले, भंडाऱ्याचा राजा मंडळाचे दरवर्षीचे उपक्रम हे प्रेरणादायी आहे. डॉ.गिऱ्हेपुंजे यांनी रुग्णसेवा केली तो काळ खऱ्या अर्थाने समाजसेवा ठरावी असा होता. जिल्ह्यातील आरोग्य सेवेत अडचणी आहेत. राजकीय हेवेदावे विसरून एकत्र येण्याची गरज आहे. नाग नदीतून वैनगंगेत रसायनकयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्याचे व्रत सर्वांनी घेतले पाहिजे. एकजुटीने कार्य केल्यास जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल. जिल्ह्याचे मागासलेपणाचे ग्रहण दूर करून जिल्ह्याचा सांस्कृतिक वसा देश पातळीवर पोहचविण्याचा आपला मानस असून त्यासाठी जानेवारी महिन्यात वैनगंगा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त सत्कारमूर्ती डॉ.गिऱ्हेपुंजे म्हणाले, हा माझा एकट्याचा सत्कार नसून भंडारावासियांचा हा सत्कार आहे.र् सामान्य कुटुंबात जन्माला येऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. भंडारा शासकीय रुग्णालयातून रुग्णसेवा केली. सेवेला काही दिवस शिल्लक असताना प्रशासनाने बदली केली. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना रुग्णसेवा देता यावी यासाठी नोकरीचा राजीनामा देऊन रुग्णालय सुरू केले. सेवेदरम्यान बालकांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रीत केले. वर्षातून केवळ दोन दिवस रुग्णालय बंद ठेवत असून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अविरत रुग्णसेवा करीत राहण्याचा निश्यचही त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांनी शहरातील छोटाबाजार येत्या काही दिवसात या परिसरातून हलविण्यात येणार असून या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याचा आपला मानस आहे. याप्रसंगी आ.रामचंद्र अवसरे, धनंजय दलाल यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अजय वंजारी यांनी केले. संचालन रामधन धकाते यांनी तर आभारप्रदर्शन मंगेश वंजारी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्तांसाठी ११ हजारांची मदत
सामाजिक उपक्रम अग्रक्रमावर असलेल्या ‘भंडाराचा राजा’ या गणेश मंडळाकडून दरवर्षी रक्तदान शिबिर, अनाथालयाला भेटवस्तूंचे वाटप, वृक्षारोपण, शहीद भगतसिंहाच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी राज्यात दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन मंडळाचे संयोजक मंगेश वंजारी यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा प्रस्ताव मंडळापुढे मांडला. त्यावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला समर्थन करीत स्वखर्चातून दुष्काळाग्रस्तांसाठी निधी जमा करुन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ या नावाने ११ हजार रूपयांचा धनादेश तहसीलदार सुशांत बनसोडे यांच्याकडे सुपूर्द केला. मंडळाच्या या सामाजिक दायित्वाचे उपस्थित अतिथींनी कौतुक केले.
सत्काराची रक्कम रुग्ण कल्याण समितीला दान
पहिले भंडारा भूषण पुरस्काराचे मानकरी ठरलेले डॉ.लोकनाथ गिऱ्हेपुंजे यांना मंडळाने शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ११ हजार रुपये रोख देऊन सत्कार केला. या सत्कारात मंडळाने दिलेलील रक्कम रुग्ण कल्याण समितीला दान देऊन यातून गरिब रूग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्यातून आर्थिक मदत व्हावी, असा मनोदय व्यक्त केला.