हिवताप : ३४ गावे अतिसंवेदनशील
By Admin | Updated: June 10, 2014 23:51 IST2014-06-10T23:51:00+5:302014-06-10T23:51:00+5:30
डासांपासून होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महिनाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यादरम्यान हिवतापाचा उद्रेक होऊ नये, यासाठी अतिसंवेदनशील श्रेणीतील ३४ गावात

हिवताप : ३४ गावे अतिसंवेदनशील
तपासणीसाठी आरडीके किट : आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात जनजागृती मोहीम
भंडारा : डासांपासून होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महिनाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यादरम्यान हिवतापाचा उद्रेक होऊ नये, यासाठी अतिसंवेदनशील श्रेणीतील ३४ गावात आरोग्य विभागाकडून धूर फवारणी करण्यात येणार आहे. ही मोहीम १७ जूनपासून आरंभ होईल, अशी माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
२४ ठिकाणी रक्त नमुने तपासणी
जिल्ह्यात २४ ठिकाणी हिवतापाच्या रुग्णाचे रक्तनमुने तपासण्यात येतात. याठिकाणी संशयित रुग्णांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करुन उपचार केले जातात. त्याअंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक गावात आरोग्य कर्मचारी ‘गृहभेट’ देऊन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
तपासणीसाठी आरडीके किट
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे आणि जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.देवेंद्र पातुरकर माहिती देताना म्हणाले, हिवताप रुग्णांचे रक्त नमुने तातडीने तपासण्यासाठी आरडीके (रॅपीड डाइग्नोस्टिक किट) आली आहे. या कीटमुळे करण्यात येणारे परिक्षण परिपूर्ण नसले तरी मलेरियाचे लक्षण ओळखण्यासाठी पुरेशी आहे. ही कीट जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि आशा सेविकांजवळ उपलब्ध करण्यात आले आहेत.
डासांपासून होणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यू, डेंग्यूसदृष्य ताप, चंडीपुरा आणि इन्सेफ्लाईटिस (मस्तिष्क ज्वर) यामुळे मृत्यू होऊ शकतो असे सांगून मलेरिया या आजारापासून सन २००८ नंतर कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
जानेवारी २०१४ ते मे महिन्यापर्यंत झालेल्या तपासणी मोहिमेत भंडारा जिल्ह्यातील ३४ गावे मलेरिया आजारासंदर्भात अतिसंवेदनशील असल्याचे उघडकीला आले आहे. या सर्व ३४ गावांमध्ये किटकनाशकाची फवारणी करण्यात येणार आहे. या गावातील ४५,४३७ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फवारणी करण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील ३४ गावांच्या यादीमध्ये पवनी तालुक्यातील बेटाळा, आमगाव, ठाणेगाव, रोहणा, परसोडी, चांदी, सिंदपुरी, सायतानगर या गावांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील पागोरा, सिरसघाट, करचखेडा, कोका तर मोहाडी तालुक्यातील पांजरा, लेंडेझरी (जांभोरा), फुटाळा व पाचगाव या गावांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील लेंडेझरी, लाखनी तालुक्यातील गडेगाव, सोनेखारी, दैतमांगली, रेंगेपार, मेंढा तर लाखांदूर तालुक्यातील अंतरगाव, दांडेगाव, मानेगाव, पारडी व साकोली तालुक्यातील न्याहारवानी, सानगाव, नैनपूर, महालगाव, विरसी, सीतेपार, साकोली व गिरोली गावाचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)