सामान्यातून असामान्य व्यक्तीमत्व घडवा
By Admin | Updated: January 22, 2016 01:47 IST2016-01-22T01:47:21+5:302016-01-22T01:47:21+5:30
आजचा विद्यार्थी खऱ्या अर्थाने संघर्ष करीत आहे. माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी अत्यंत

सामान्यातून असामान्य व्यक्तीमत्व घडवा
भंडारा : आजचा विद्यार्थी खऱ्या अर्थाने संघर्ष करीत आहे. माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी अत्यंत हलाखीच्या परीस्थितीतून असामान्य कर्तृत्व सादर करून मोठे पद प्राप्त केले. अशाच सामान्यातून असामान्य व्यक्तीमत्व घडविण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे प्रतिपादन खा.नाना पटोले यांनी केले.
येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण नागपूर आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व ग्रंथ प्रदर्शनीत ते बोलत होते.
यावेळी मंचावर आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा साबळे, शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे, ज्येष्ठ साहित्यीक हरिश्चंद्र बोरकर, नीळकंठ रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सकाळ सत्रात ९ वाजता शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. अतिथींच्या हस्ते प्रदर्शनीचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ.अवसरे, जि.प. अध्यक्ष गिलोरकर, राजेंद्र निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी ग्रंथ प्रदर्शनीचे अवलोकन करून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रतिकृतींची पाहणी करीत त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीचे कौतूक केले.
शुक्रवारपासून ग्रंथ प्रदर्शनी व विज्ञान प्रदर्शनी सर्वांकरिता खुली राहणार आहे. तसेच सकाळी ११ ते दुपारी २ वाजता या दरम्यान शालेय शिक्षणात ग्रंथाचे उपयोग या विषयावर परिसंवाद व दुपारी ३ वाजतापासून नृत्य कार्यक्रम होणार आहे. २३ पर्यंत ही प्रदर्शनी राहणार आहे.
विज्ञान तथा ग्रंथप्रदर्शनी असल्यामुळे शाळेत भेट देणा-यांची संख्या लक्षात घेता शाळा प्रशासनाने गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली आहे. शाळेच्या आतील पटांगणात गं्रथाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)