वंचितांच्या आयुष्यात संपन्नता आणा
By Admin | Updated: April 9, 2015 00:38 IST2015-04-09T00:38:07+5:302015-04-09T00:38:07+5:30
वंचित, दुर्बल घटकांना समान न्याय मिळावा, त्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या, विकासाच्या आणि आर्थिक संपन्नतेच्या संधी पोहोचाव्या, ..

वंचितांच्या आयुष्यात संपन्नता आणा
सामाजिक सप्ताहाचा शुभारंभ : जिल्हाधिकारी खोडे यांचे प्रतिपादन
भंडारा : वंचित, दुर्बल घटकांना समान न्याय मिळावा, त्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या, विकासाच्या आणि आर्थिक संपन्नतेच्या संधी पोहोचाव्या, यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक समता सप्ताह बुधवारपासून १४ एप्रिलपर्यंत राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त डी.एन. धारगावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए.आर. रामटेके उपस्थित होते.
समाजाच्या विशिष्ट घटकातील लोकांप्रती अजूनही चांगली भावना जनतेमध्ये दिसत नाही. या सप्ताहाच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये सद्भावना आणि समता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.
राज्य घटनेतील कलम ४६ मधील निर्देशांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करून राज्यातील अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय ठेवून सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने यावर्षीपासून घेतलेला आहे.
या सप्ताहात विविध महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्जाचे लाभार्थ्यांना वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच व्यसनमुक्तीसाठी प्रचार व प्रसिद्धी आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डी.एन. धारगावे यांनी केले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सतीश मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडे तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)