नुकसानग्रस्त धानपिकाचे पंचनामे करा
By Admin | Updated: October 15, 2016 00:37 IST2016-10-15T00:37:31+5:302016-10-15T00:37:31+5:30
निसर्गाच्या अवकृपेमुळे त्रस्त झालेला शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

नुकसानग्रस्त धानपिकाचे पंचनामे करा
विनायक बुरडे : धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत
भंडारा : निसर्गाच्या अवकृपेमुळे त्रस्त झालेला शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मागील महिन्या आलेल्या पावसामुळे धानपिकांचे मोठे नुकसान झाले. या धानपिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विनायक बुरडे यांनी केली आहे.
पावसाच्या विश्रांतीनंतर हलक्या धानाची कापणी सुरू झाली आहे. मळणीचे यंत्र सज्ज असून धान विक्रीकरिता उपलब्ध आहे. विनाविलंब हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही बुरडे यांनी केली आहे. धानाला किमान हमी भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असते. जेणेकरुन व्यापाऱ्याकडून लूट होणार नाही. किडीचे निवारण करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. लहरी निसर्गामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धानपीक भुईसपाट झाले आहे.
लाखनी तालुक्यातील नरव्हा गावात धान लोंबीतच अंकुरला आहे. पर्णकोष करपल्याने धानात दाणा भरलेला नाही. अशा स्थितीत धान उत्पादक शेतकरी धास्तावलेला आहे. दसरा निराशेत गेला. समोर दिवाळी आहे. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्याची गरज असून शेतकऱ्यांना नगदी चुकारे देण्याची सुविधा करुन धान खरेदीसोबत बोनस देण्याची मागणी यांनी केली आहे.
धान उत्पादक शेतकरी बांधवांच्या धान पिकाला खर्चावर आधारित हमी भाव मिळाल्या पाहिजे परंतु शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या धान पिकाला अल्प भाव मिळतो. सरकारने समन्वय साधून धानाच्या हमी भावाबाबत कायमस्वरुपी तोडगा काढून शेतकरी बांधवांच्या धानपिकाला खर्चावर आधारित हमी भाव देऊन दिलासा द्यावा अशी मागणीही सभापती बुरडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)