ऐतिहासिक राष्ट्रीय शाळा जळीतप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा
By Admin | Updated: April 30, 2016 00:37 IST2016-04-30T00:37:24+5:302016-04-30T00:37:24+5:30
शाळा जळीतकांडप्रकरणी स्वत:ला संस्थेचे पदाधिकारी म्हणविऱ्यांनी माझ्यावर तथ्यहीन, खोटे व बिनबुडाचे आरोप केल्याचे सांगत ...

ऐतिहासिक राष्ट्रीय शाळा जळीतप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा
विरोधकांचे आरोप बिनबुडाचे : मोरेश्वर निखाडे यांचे प्रतिपादन, पत्रपरिषदेत दिली माहिती
तुमसर : शाळा जळीतकांडप्रकरणी स्वत:ला संस्थेचे पदाधिकारी म्हणविऱ्यांनी माझ्यावर तथ्यहीन, खोटे व बिनबुडाचे आरोप केल्याचे सांगत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संस्था अध्यक्ष मोरेश्वर निखाडे यांनी पत्रपरिषदेत केली. त्यामुळे प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
कुबेरनगरीचा ऐतिहासिक वारसा समजल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय, तुमसर येथे ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान अचानकच आग लागली होती. त्या आगीचा व संस्थेत असलेल्या वादांचा दुरवर कुठेही संबंध येत नसताना देखील स्वत:ला संस्थेचे पदाधिकारी म्हणविऱ्यांनी मात्र ती आग संस्था अध्यक्षानेच लावल्याचा कांगावा केला. लोकांना भ्रमीत केले. मात्र त्या दिवशी संस्था अध्यक्ष निखाडे हे व्यक्तीगत न्यायालयीन कामाकरिता शाळेचे शिपाई मनोहर देशमुख व राकेश कामथे यांच्यासोबत सकाळी ११.३० वाजता दरम्यान शाळेला आग लागल्याची व नगरपरिषदेचे अग्निशमन दल नादुरूस्त असल्याचे दुरध्वनी द्वारे सांगण्यात आले. त्यामुळे वाटेत येत असलेल्या सनफ्लॅग कारखान्यात जावून अग्निशमन मिळण्याकरिता प्रयत्न केले. मात्र तिथेही अग्निशमन वाहन उपलब्ध नसल्याने उलट पावली भंडारा नगरपरिषदेमध्ये जावून तिथला अग्निशमन पाठविला. आगीला आटोक्यात आणण्याचे कार्य स्वत: निखाडे यांनी केले. निखाडे म्हणाले, जिल्हा सत्र न्ययालयात असिस्टंट चॅरिटी कमिशन भंडारा येथे ५० अ अंतर्गत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. विरोधक रामु ढोके, माणिक भुरे, ललीत थानथराटे, मधुकर सांबारे, अमरबहादुर सिंग या विरोधात निखाडे यांना स्थगनादेश मिळाल्याने ते चिडून आहेत. त्यामुळे ते आगीत तेल ओतून लोकांना भ्रमित करित सुटले आहेत. शाळेला लागलेल्या आगीत मुख्याध्यापक खोली, लिपीक खोली, शिक्षक खोली व वर्ग ५ ची खोली जळाली. त्यामध्ये केवळ शाळेचेच दस्तावेज होते. संस्थेचे नाही. त्यामुळे संस्थेत सुरू असलेल्या वादामुळे संस्था अध्यक्षांनी आग लावल्याचे केलेले आरोप बालीशपणाचे आहे. संस्थेचे ेदस्ताऐवज संस्थेत सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या लढाईत युवकांचा सहभाग असावा, याकरिता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आदेशान्वये शाळेची स्थापना करण्यात आली. याचे महत्व लक्षात घेवूनच शाळा प्रगतीपथावर नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न विरोधकांना खपत नाही. त्यामुळे खोटे आरोप करीत आहेत. शाळेला लागलेल्या आगीची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा संस्थेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच गणमान्य नागरिकांमार्फत जन आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी पत्रपरिषदेत राष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)