शौचालय निर्माण करून कुटूंब 'लयभारी' करा
By Admin | Updated: September 23, 2016 00:44 IST2016-09-23T00:44:23+5:302016-09-23T00:44:23+5:30
प्रत्येक कुटुंबात आई, पत्नी, मुलगी, बहिण, सून आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेसाठी घरी शौचालय असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे.

शौचालय निर्माण करून कुटूंब 'लयभारी' करा
शिल्पा सोनाले यांचे आवाहन : पवनारखारी येथे समाधान शिबिरात स्वच्छतेची जनजागृती
भंडारा : प्रत्येक कुटुंबात आई, पत्नी, मुलगी, बहिण, सून आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेसाठी घरी शौचालय असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. घरच्या महिलांची प्रतिष्ठाही कुटूंबांची प्रतिष्ठा असते. ही प्रतिष्ठा प्राप्त करणे, जोपासणे ही कुटूंब प्रमुखांची जबाबदारी आहे. याकरिता कुटूंब प्रमुखांनी पुढाकार घेत प्रत्येक घरी शौचालय निर्माण करून आपले कुटूंब लयभारी करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले.
कुटूंब संवाद अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत पवनारखारी येथे स्वच्छतेसाठी भेटीगाठी घेताना कुटूंबातील महिला पुरूषांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
तुमसर पंचायत समिती अंतर्गत ग्रा.पं. पवनारखारी येथे २१ सप्टेंबरला महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खंड विकास अधिकारी मनोज हिरूडकर यांचे नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या कुटूंब संवाद अभियानाच्या माध्यमातून आयईसी स्टॉल लावून स्वच्छतेसाठी जनगाृती करण्यात आली. गृहभेटी कार्यक्रमाप्रसंगी सरपंच कविता बमचेर, पंचायत समिती सदस्य सयाम, ग्राम विकास अधिकारी भांडारकर, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, जलसुरक्षक विनोद सयाम, मित्रा संस्था व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
गृहभेटी करताना कुटूंबाकडे असलेल्या शौचालयाच्या स्थितीनुसार लयभारी, खतरा धोका संदेशाचे स्टिकर्स लावून त्याबाबत स्वच्छतेचे महत्व सांगितले. तसेच त्या घरांना लाल रंगाचे स्टिकर्स लावले त्यांना बांधकाम व वापर करून हिरवा स्टिकर्स लावून कुटूंबांना लयभारी करण्याचे आवाहन केले.
सोबतच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर यांच्या स्वाक्षरीने असलेले आवाहन पत्र वितरीत करून शौचालयाकरिता पुढाकार घेण्याची विनंती केली. याप्रसंगी सरपंच कविता बमचेर यांनी पवनारखारी गावाची हागणदारीमुक्तीकडे सुरू असलेल्या वाटचाली बद्दल उपविभागीय अधिकारी सोनाले यांना माहिती दिली. (नगर प्रतिनिधी)