बालपणापासून मुलांना संस्कारक्षम बनवा
By Admin | Updated: October 7, 2015 01:49 IST2015-10-07T01:49:50+5:302015-10-07T01:49:50+5:30
बाळ जन्माला आल्यानंतर त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र त्या बाळात संस्कार घडविले जात आहेत की नाही याची काळजी घेतली जात नाही.

बालपणापासून मुलांना संस्कारक्षम बनवा
स्वामी नरेंद्राचार्य महाराज : ४० हजार अनुयायांनी घेतला दर्शनाचा लाभ
संजय साठवणे साकोली
बाळ जन्माला आल्यानंतर त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र त्या बाळात संस्कार घडविले जात आहेत की नाही याची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे लहानपणापासून मुलांना संस्कारक्षम बनविणे गरजेचे आहे. ही जबाबदारी आईवडीलांची जशी असते तसेच समाजाला संस्कारक्षम बनविण्याची जबाबदारी संतांची आहे, असे मत जगतगुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी दार्शनिक प्रवचनातून व्यक्त केले.
साकोली येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित नरेंद्रचार्य महाराज यांचे प्रवचन व साधक दीक्षा सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, खा.पटोले यांच्या सहचारिणी मंगला पटोले, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी विनोद पटोले, सत्यवान हुकरे, विहीपचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय एकापुरे, राहुल चव्हाण, गीता कापगते उपस्थित होते.
यावेळी खा.पटोले यांनी महाराजांचे सपत्नीक स्वागत केले. तत्पूर्वी महाराजांचे स्वागतगीताने स्वागत करण्यात आले. सामाजिक उपक्रमातंर्गत अपंग बांधवांना ट्रायसिकल तर शेतकऱ्यांना पिकांवर औषधी फवारणीचे यंत्र अतिथींच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी नरेंद्राचार्य महाराज म्हणाले, संत आणि आईमध्ये जास्त फरक नसतो. म्हणूनच संतांना मायबाप म्हणतात. आई मुलांचे लाड करते तर वडील मुलांना शिकवून वळण लावतात. आजच्या युगात महिलांची कुचंबणा होत आहे. समाजात मातृत्त्वाबद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. धर्मांमधील भेदाभेद वाढत आहे. स्त्रीभू्रूण हत्या हा मानव जातीवरील कलंक आहे. विज्ञाननिष्ठ युग बनत असले तरी मानवाची मानसिकता आजही संकुचित आहे. ‘जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या’ हा धर्म सर्वांनी जपला पाहिजे. तेव्हाच समाजाचे पर्यायाने राष्ट्राचे कल्याण होते.
साकोलीला आले यात्रेचे स्वरुप
नरेंद्राचार्य महाराज येणार असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी साकोलीत कालपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. रस्त्यावर विविध दुकाने थाटण्यात आलेली होती. प्रवचन व दीक्षा सोहळ्यामुळे साकोलीला यात्रेचे स्वरुप आले होते. आजच्या या दर्शन सोहळ्यासाठी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातून भाविक आले होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
नरेंद्रचार्य महाराज यांच्या दर्शन सोहळ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. १०० अतिरिक्त पोलीस कर्मचारी जिल्हाभरातून पोलीस प्रशासनाने तैनात केले होते.