मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी
By Admin | Updated: April 12, 2015 01:04 IST2015-04-12T01:04:41+5:302015-04-12T01:04:41+5:30
गर्भपातादरम्यान सोनी येथील मूळ रहिवाशी यशोधरा बांगडकर या तरुणीचा मृत्यू झाला होता.

मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी
भंडारा : गर्भपातादरम्यान सोनी येथील मूळ रहिवाशी यशोधरा बांगडकर या तरुणीचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह वैनगंगा नदीत फेकून दिला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी सुमित लंजे (२२) रा. सेंदूरवाफा याला न्यायालयाने सात दिवसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात गर्भपात करणारा डॉक्टर अद्याप फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
कारधा पोलिसांनी शनिवारला सुमित लंजेला भंडारा न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणातील अन्य आरोपींना उद्या रविवारला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या तरुणीचा गर्भपात गिरोला येथील डॉ.दास याने केला होता. घटना उघडकीस आल्यानंतर तो फरार झाला. आज घटनेच्या तिसऱ्या दिवशीही तो फरात असून पोलीस त्याच्या मागावर आहे. त्याच्या शोधासाठी कारधा पोलिसांनी तीन पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना केले आहे.
पोलिसांनी यापूर्वीच मुख्य आरोपी सुमित लंजे याच्यासह सुमितच्या घरी ट्रॅक्टरवर काम करणारा महेश कापगते आणि दाईनचा मुलगा ओमप्रकाश ईलमकर, दाईन बायाबाई ईलमकर व वाहनचालक पिंटू बोरकर अशा पाच आरोपींना अटक केली होती. याशिवाय मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.
या प्रकरणाचा तपास साकोली पोलिसांना सोपविण्याची कार्यवाही सुरू होती. परंतु आता हा तपास कारधा पोलिसांकडे देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. याप्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आता पुरावा नष्ट करणे या भादंवि २०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)