Maharashtra Election 2019 ; स्वपक्षीयांचे बंड मोडण्याचे पक्षश्रेष्ठींपुढे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:00 AM2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:37+5:30

युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनेही भंडारात बंडखोरी केली आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नामांकन दाखल केले. आघाडीतही धुसफूस दिसत असून काँग्रेसच्या वाट्याची तुमसरची जागा राष्ट्रवादीला गेल्याने काँग्रेसचे डॉक्टर पंकज कारेमोरे यांनी उमेदवारी दाखल केली. यासोबतच राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बावनकर आणि शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनीही नामांकन दाखल केले आहे.

Maharashtra Election 2019 ; The big challenge to the party class is to break the uprising | Maharashtra Election 2019 ; स्वपक्षीयांचे बंड मोडण्याचे पक्षश्रेष्ठींपुढे मोठे आव्हान

Maharashtra Election 2019 ; स्वपक्षीयांचे बंड मोडण्याचे पक्षश्रेष्ठींपुढे मोठे आव्हान

Next
ठळक मुद्देयुती -आघाडीत पेच प्रसंग । आजी-माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऐन वेळेवर तिकीट कापल्याने आणि पक्षश्रेष्ठींनी शब्द देऊनही उमेदवारी नाकारल्याने जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. आता त्यांचे बंड कसे मोडून काढायचे यासाठी पक्षश्रेष्ठी व्यूहरचना आखत असून सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे. तर बंडखोर कोणती भूमिका घेतात याकडे तुमसर आणि भंडारा मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भाजपने तीनही विद्यमान आमदारांचे तिकीट कापून मोठा धक्का दिला. यापैकी तुमसर आणि भंडाराच्या आमदारांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांचे नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तिकीट कापले. आपले तिकीट कापले जाईल याचा काही दिवसांपासून अंदाज त्यांना आला होता. त्यामुळेच त्यांनी नामांकनाची तयारी चालविली होती. नामांकन दाखल करताना त्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनातून याचा अंदाज येतो. आता त्यांचे बंड कसे थंड करयाचे हा प्रश्न पक्षश्रेष्ठीपुढे आहे. भजप उमेदवारांचा मार्ग सुकर करण्यासाठी त्यांची उमेदवारी मागे घेण्यसाठी प्रयत्न केले जाणार आहे. आता त्यांची समजूत कशी काढली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भंडाराचे भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांनाही तिकीट नाकारण्यात आले. येथील जागा महायुतीच्या आठवले गटाला गेली, परंतु पाच वर्षे सत्तेत असलेल्या आमदार अवसरे यांनी नामांकन दाखल करून बंडखोरी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र त्यांनी सावध पवित्रा घेत कार्यकर्त्यांचा विचार घेऊन उमेदवारीचा निर्णय घेणार असल्याचे सांगत आहेत. साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांचीही तिकीट कापण्यात आली. त्यांनीही उमेदवारी दाखल केली. दरम्यान छाननीत त्यांचे नामांकन एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरले. यामुळे येथील मार्ग भाजपसाठी मोकळा झाला आहे. काशीवार नामांकन दाखल करण्यापासून भाजप उमेदवार डॉ.परिणय फुके यांच्यासोबत आहेत.
युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनेही भंडारात बंडखोरी केली आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नामांकन दाखल केले. आघाडीतही धुसफूस दिसत असून काँग्रेसच्या वाट्याची तुमसरची जागा राष्ट्रवादीला गेल्याने काँग्रेसचे डॉक्टर पंकज कारेमोरे यांनी उमेदवारी दाखल केली. यासोबतच राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बावनकर आणि शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनीही नामांकन दाखल केले आहे. साकोली मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. युतीतील बंड दोन दिवसात थंड होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातील बंडखोरी कशी मोडून काढली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

तीनही मतदारसंघात तिरंगी लढतीची स्थिती
तुमसर, भंडारा आणि साकोली या तीनही मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. तुमसरमध्ये भाजपचे प्रदीप पडोळे, राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांच्या सह अपक्ष आमदार चरण वाघमारे रिंगणात आहेत. वाघमारे यांची उमेदवारी कायम राहिल्यास येथे तिरंगी लढत निश्चित आहे. भंडारा मध्ये महायुतीचे अरविंद भालाधरे आणि आघाडीचे जयदीप कवाडे यांच्यापुढे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आव्हान उभे केले आहे. तेही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. साकोलीमध्ये माजी आमदार सेवक वाघाये यांनी उमेदवारी दाखल केल्याने तीनही मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 ; The big challenge to the party class is to break the uprising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.