तुमसरच्या बाजारपेठेत मध्य प्रदेशातील धान्य
By Admin | Updated: June 14, 2014 01:39 IST2014-06-14T01:39:58+5:302014-06-14T01:39:58+5:30
मागील काही महिन्यांपासून मध्यप्रदेशातील धान्य तुमसरच्या बाजारपेठेत

तुमसरच्या बाजारपेठेत मध्य प्रदेशातील धान्य
तुमसर : मागील काही महिन्यांपासून मध्यप्रदेशातील धान्य तुमसरच्या बाजारपेठेत सर्रास विक्रीकरीता येत असल्याची माहिती आहे. या धान्यात तांदूळ व गव्हाचा समावेश
आहे. हे धान्य विदर्भासह मराठवाड्यात पाठविले जात असून या गोरखधंद्याचा पर्दाफाश करणारी यंत्रणा सक्षम नसल्यामुळे या रॅकेटचे फावत आहे.
केंद्र व राज्य शासन गरीब नागरिकांसाठी बीपीएल, अंत्योदय व अन्न सुरक्षा योजने अंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून दरमहिन्याला धान्य पुरवठा करते. मध्यप्रदेशातही या
योजनेतून गरीबांना धान्य दिले जाते. सध्या हे धान्य तांदूळनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुमसरातील बाजारात सर्रास विक्रीकरीता येत आहे.
मध्यप्रदेशात हे धान्य गोळा करणारी टोळी सक्रीय आहे. ही टोळी तुमसर येथील टोळीच्या संपर्कात आहे. मालवाहतूक रेल्वे आणि पीकअप व्हॅनमधून हे धान्य तुमसर येथील
बाजारपेठेत दाखल होत आहे.
भंडारा जिल्ह्यात शंभरावर राईस मिल आहेत. या राईस मिलमध्ये ठोकळ तांदळाला बारीक करण्यात येते. त्याची चांगल्या पिशवीत पॅकिंग करुन हा तांदूळ विदर्भासह
मराठवाडा व मुंबईकडे रवाना केला जात आहे. गव्हाचीसुद्धा पॅकिंग करुन हा व्यवसाय केला जात आहे. याशिवाय शासनाकडून शाळांना माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत
तांदूळ पुरविले जातात. ते तांदूळसुद्धा विदर्भासह मराठवाड्यात विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. यंत्रणा सक्षम नसल्यामुळे या टोळीचे चांगलेच फावत आहे.
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करताना कुठेही तपासणी नाका नाही. तपासणी झाली तर विक्रीकरीता धान्य नेले जात आहे, असे सांगण्यात येते. धान्य विक्रीला मज्जाव नाही.
परंतु हे धान्य कुणाचे आहे, याचा शोध घेण्याची तसदी मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील सक्षम अधिकारी घेत नाहीत. अर्थकारणामुळे कायद्याचा किस काढणे सुरू आहे. याबाबत
अन्नपुरवठा विभागही अनभिज्ञ आहे. या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला तर मोठे रॅकेट गळाला लागू शकतात, परंतू मांजरीच्या गळ्यात कोण घंटा बांधणार असा प्रश्न येथे
पडला आहे.
(तालुका प्रतिनिधी)