प्रेमीयुगूल अर्ज घेऊन आले, विवाहबंधनात अडकले
By Admin | Updated: November 12, 2014 22:38 IST2014-11-12T22:38:48+5:302014-11-12T22:38:48+5:30
प्रेमात पडलेल्या प्रेमविराचे जग निराळेच असते. त्यांनी लग्न करतो म्हटले की अनेक समस्या येतात. जात, धर्म व नातलगाचा विरोध अशा भानगडीत अनेक प्रेमविवाह होतात.

प्रेमीयुगूल अर्ज घेऊन आले, विवाहबंधनात अडकले
वरठी : प्रेमात पडलेल्या प्रेमविराचे जग निराळेच असते. त्यांनी लग्न करतो म्हटले की अनेक समस्या येतात. जात, धर्म व नातलगाचा विरोध अशा भानगडीत अनेक प्रेमविवाह होतात. त्यांच्या या सोहळ्यास आप्तस्वकीयांसह वऱ्हाडी कमी असतात. पण मोहाडी तालुक्यातील पाहुणी या गावातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख देत एका प्रेमी युगुलाचे लग्न अर्धा तासाच्या तयारीत धुमधडाक्यात लावून दिले.
भंडारा येथील रहिवासी असलेले कपील बनसोडे याचे एका महाविद्यालयीन युवतीशी प्रेमसुत जुळले. दोघांचेही शिक्षण सुरु होते. तीन वर्षाच्या प्रेमसंबंधात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण घरून विरोध. अशात कपीलने एका नातेवाईकाची मदत घेतली. मित्राच्या मदतीने कपील व हर्षलताचे लग्न महात्मा गांधी तंटामुक्त समिती पाहुणीच्या माध्यमातून लावून देण्याचे ठरविले.
लग्न लावण्याचे ठरले. पण त्यासाठी तयारी नव्हती. त्यातल्या त्यात घरच्यांचा विरोध होता. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण मिरासे, पोलीस पाटील चव्हाण, सरपंच छोटुलाल मिरासे यांनी प्रेमी युगुलाची कसून विचारपूस केली. कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. लग्नाचे अर्ज घेवून आलेले युगुल घर सोडून आले होते. कोणत्याही प्रकारचे साहित्य त्यांच्याजवळ नव्हते.
अशात सरपंच छोटुलाल मिरासे यांनी गावातून पुजेची हळद आणली. माजी सरपंच भगवान धुर्वे यांनी घरून नवरदेवाची टोली दिली. प्रतिष्ठत नागरिक रामू बदने यांनी अक्षदा बोलाविल्या. गावातून काही युवकांनी दिवाळीनिमित्त ठेवलेले फटाके आणले. सार्वजनिक मंदिरातील भोंग्याचा आधार घेतला व पाहता पाहता शेकडो महिला पुरुष प्रेमी युगुलांना आशीर्वाद देण्यास जमा झाले. एका इसमाच्या मोबाईलवर मंगलाष्टक वाजवून लग्नाचा बार उडवून लावला.
सरपंच छोटुलाल मिरासे, तंमुस अध्यक्ष बाळकृष्ण मिरासे, माजी सरपंच भगवान धुर्वे, पोलीस पाटील प्रितम चव्हाण, ग्रा.पं. सदस्य प्रकाश पुडके, रामू बदने, संजय पटले, सीताराम गोमासे, देवीलाल मिरासे यांच्या पुढाकाराने या प्रेमी युगलाचे लग्न लावून दिले. हा लग्न सोहळा येथे न थांबता गावातील अनेकांनी या जोडप्यास भेट म्हणून पैसे दिले. एकंदरीत तंमुसच्या माध्यमातून आजतागायत झालेल्या लग्न सोहळ्यापैकी हा सोहळा वेगळा होता. (वार्ताहर)