भरदिवसा दुकानदाराला लुटले
By Admin | Updated: June 25, 2014 23:35 IST2014-06-25T23:35:05+5:302014-06-25T23:35:05+5:30
येथील मुख्य मार्गावरील रघुते कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका साडी सेल दुकानदाराला दरोडेखोरांनी दुकानात शिरून फिल्मी स्टाईलने लुटले. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

भरदिवसा दुकानदाराला लुटले
वरठीतील घटना : देशीकट्टा व शस्त्राच्या धाकावर घडला प्रकार
वरठी : येथील मुख्य मार्गावरील रघुते कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका साडी सेल दुकानदाराला दरोडेखोरांनी दुकानात शिरून फिल्मी स्टाईलने लुटले. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने नागरीक तथा दुकानदारांमध्ये भिती निर्माण झाली आहे. यावेळी दुकानाचे मालक प्रदिपकुमार शर्मा यांना मारहाणही करण्यात आली.
तक्रारीवरून पोलिसांनी दिनेश राठोड, शेरू उर्फ हर्षद राहुल मेश्राम व अन्य दोघावर भादंवि ३९४, ३८६ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. दोघेही दरोडेखोर हे कुख्यात गुंड असून त्यांच्यावर अनेक गुन्हे पोलिसात दाखल आहेत. पोलिसांना मात्र त्यांना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही.
बसस्थानक रस्त्यावर रघुते कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावर साडीसेलचे दुकान आहे. दि.२४ रोज मंगळवारला गावातील कुख्यात गुंड दिनेश राजु राठोड व हर्षद राहुल मेश्राम याच्यासह अन्य दोघे सायंकाळी ४ वाजता दुकानात घुसले. त्यावेळी दुकानाचे मालक प्रदिपकुमार शर्मा दुकानात बसले होते.
त्यांच्याजवळ जावून दिनेश राठोड याने मालक कुठे आहे म्हणून विचारणा केली व उत्तर देण्याच्या वर मारहाण केली ते खाली पडताच त्यांच्यातील एकाने गल्ल्यातील पैसे चोरून नेले.
दुकानदाराने आरडाओरड पाहुन गर्दी जमा होताच त्यांनी पळ काढला. दरम्यान दुकानातील दहा हजार रूप्ये चोरून नेले व सायंकाळ पर्यंत ५० हजार रूपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
दिनेश राठोड व हर्षद मेश्राम हे कुख्यात गुंड आहेत. दोघांवर रेल्वे पोलीस व विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत. कामठी व नागपूर येथून गुंड आणून गावात हैदोस पसरवण्याचे काम सुरू असून प्रवाशांना लुटने व धमकावने यासह शसस्त्र हल्ला करण्यासारखे अनेक प्रकरणात त्यांचे नाव गुंतलेले आहे. रेल्वे स्थानक परिसरात ही त्यांच्या हैदोस सुरू राहतो.
दिनेश राठोडचे वडील रेल्वेत नौकरीवर असल्यामुळे त्याला कोणीही मज्जाव करत नाही. साडी सेल मालक प्रदीपकुमार शर्मा यांनी १५ दिवसापुर्वीच वरठी येथे दुकान थाटले होते. अचानक झालेल्या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली आहे. घटनेतील आरोपींना पकडून कारवाई करण्याची मागणी शर्मा यांनी केली आहे. (वार्ताहर)