शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:41 IST2017-06-28T00:41:59+5:302017-06-28T00:41:59+5:30

शाळा सुरु होण्याच्या एक दिवसाअगोदर जांभोरा येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेच्या पालकांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.

The locks locked by parents for the teacher's demand | शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

जांभोरा जि.प. शाळेचे प्रकरण : समस्या सुटेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : शाळा सुरु होण्याच्या एक दिवसाअगोदर जांभोरा येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेच्या पालकांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.
शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. तसेच तीन पदवीधर शिक्षकांचे पदे रिक्त असल्याने मागील वर्षीही मुलांचे नुकसान झाले. प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे यावर्षी पुन्हा नुकसान होण्याचा संभव असल्याचे कारण समोर करीत, जोपर्यंत शिक्षकांची समस्या दूर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.
जांभोरा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. शाळेत वर्ग १ ते ७ मध्ये १८५ पटसंख्या असून फक्त ४ शिक्षक कार्यरत आहेत. पदविधर शिक्षकांचे ३ पदे तर उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद मागील वर्षांपासून रिक्त असल्याने शिक्षकांना अध्यापनासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनेकदा जि.प. प्रशासनाला याबाबत कळविण्यात आलेले असतानाही प्रश्न जैसे थे च आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने मागील वर्षी शिक्षकांची पूर्तता करण्याचा शब्द पाळला नाही. त्यामुळे ग्रामस्थांत रोष आहे. मागील वर्षांपासून या शाळेत शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न कायम असून अनेकदा प्रशासनाला माहिती देण्यात आली. तसेच शाळेच्या प्रारंभीच शाळा बंद आंदोलन करूनही प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यात प्रशासनाला अपयश आले. यावर्षी सुद्धा परिस्थिती बिकट असल्याने अनेक पालकांनी शाळेतून मुलांच्या टिसी काढण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन जाणीवपूर्वक खासगी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठीच दुर्लक्ष करीत तर नाही, अशी शंका ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.
यावर्षी पुन्हा शिक्षकांचा प्रश्न कायम असल्याने मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती विलास गोबाडे, सरपंच भूपेंद्र पवनकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यालाल बिसने, उपसरपंच अरुणा दुपारे व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळेला कुलूप ठोकले. यावेळी जांभोरावासीय मोठ्या संख्येने पस्थित होते.

Web Title: The locks locked by parents for the teacher's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.