जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही
By Admin | Updated: January 18, 2015 22:38 IST2015-01-18T22:38:11+5:302015-01-18T22:38:11+5:30
गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या एक जखम सुगंधी या मराठी गझल गायनाच्या कार्यक्रमाने भंडारावासी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते जिल्हा माहिती कार्यालय भंडारा व माध्यमिक शिक्षण

जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही
भंडारा : गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या एक जखम सुगंधी या मराठी गझल गायनाच्या कार्यक्रमाने भंडारावासी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते जिल्हा माहिती कार्यालय भंडारा व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या विद्यमाने आयोजित भंडारा गं्रथोत्सवाचे. अतिशय भावविभोर अशा गझलांनी भीमरावजींनी भंडारावासीयांच्या टाळ्यांसह त्यांच्या मनातही घर केले.
‘वाचलेली ऐकलेली माणसे कुठे गेली?
पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे?’
या इलाही जमादार यांच्या गझलेने एक जखम सुगंधी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता, कोणत्या काळात सांगा सभ्य होती माणसे? असे प्रश्न विचारत इलाही जमादार यांनी लिहिलेल्या अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा असे शेर सादर करून भीमरावजींनी रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. गझल सादर करत असताना, वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यास ते विसरले नाहीत.
तोडाल वृक्ष जेव्हा ध्यानात हे असू द्या, कित्येक पाखरांचा तो आरसा असावा.
असा मौलीक संदेश या निमित्ताने त्यांनी दिला. मराठी गझल सातासमुद्रापार घेऊन जाणारे भीमराव पांचाळे यांनी मराठी गझलच्या विविध छटा उलगडून दाखविलय. अकराशे वर्षापूर्वी अमिर खुसरो यांनी उर्दू आणि पारसी भाषेच्या अतिशय खुबीने वापर करून गझल लिहीली. त्याचा एक शेर उर्दू तर दुसरा पारसी भाषेत लिहिला होता. तरी सुद्धा दोन्ही भाषेचा गोडवा कायम होता. हा प्रयोग मराठी भाषेत पहिल्यांदा करण्यात आला अशी आठवण सांगून भीमरावजींनी मराठी व उर्दू भाषेचा संगम असणारी अप्रतीम गझल सादर केली.
‘‘ऐ सनम आंखों को मेरी खुबसुरत साज दे,
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे,
ऐ खुदा मै चाहता हूं, हर कोई चाहे मुझे, गंध दे मजला फुलांचा हसणे निर्वाज्य दे
ऐ खेदा इन्सान को इन्सानियत पहले सिखा, भावना तू दे त्याला आणि थोडी लाज दे’’.
अमिर खुसरो नंतरच्या मराठीतील या पहिल्याच प्रयोगाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. जानेवारीच्या गुलाबी थंडीत गझलाची ही मैफल उत्तरोत्तर फुलतच गेली. रसिकांच्या वन्समोअर प्रतिसादाने रंगलेल्या या मैफलीत भीमरावजींनी सुरेश भटांच्या तरल गझलने आणखी रंग भरले.
कार्यक्रमाला सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी भीमराव पांचाळे व त्यांच्या सहकालाकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मैफीलीला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.