बोगस डॉक्टरांच्या उपचाराने पशुधन धोक्यात
By Admin | Updated: December 8, 2015 00:37 IST2015-12-08T00:37:09+5:302015-12-08T00:37:09+5:30
पालोरा परिसरात पशुधनांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे.

बोगस डॉक्टरांच्या उपचाराने पशुधन धोक्यात
शासनाची कारवाई शून्य : चुकीच्या निदानामुळे जनावरे दगावली
पालोरा (चौ) : पालोरा परिसरात पशुधनांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. यामुळे पशुधनांवर निदान करताना यांच्याकडून चूकीचे औषधोपचार करण्यात येत असल्याने पशुधन धोक्यात आले आहे.
परिसरातील लोणारा, भेंडाळा, मोखारा, खैरी, पिंपळगाव यांच्यासह अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. डॉक्टर सांगून जनावरांवर उपचार करताना शेतकऱ्याकडून पैशाची लुटमार करण्यात येत आहे. यांच्या उपचारामुळे अनेक जनावरे दगावले आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकादा निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीवर आधारित जोळधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. परिसरात शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय असल्यामुळे बाराही महिने जनावरांसाठी वैरण मिळत असते. शेतकऱ्याकडे जवळपास १०-१५ जनावरे आहेत. दररोज हजारो लीटर दूध विक्रीला जाते. या परिसरात दुधाचे उत्पादन जास्त असल्यामुळे पालोरा येथे दुध संकलन केंद्र आहे. जिल्हा परिषद अंतर्गत ठिकठिकाणी पशुधन दवाखाने आहेत. दुधात वाढ व्हावी म्हणून प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. याचाच फायदा घेत बोगस डॉक्टरांमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या घरावर, वाहनावर, नावासमोर डॉक्टरांचे चिन्ह लावून जनतेची दिशाभूल करीत आहेत. एकट्या लोहारा गावात जवळपास चार ते पाच पशुंचे डॉक्टर बोगस व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या उपचाराने अनेक जनावरांमध्ये अपंगत्व झाले.
शासकीय दवाखान्यातील पुशवैद्यकीय डॉक्टर दवाखान्यात राहत नसल्यामुळे येथे उपचाराकरिता जनावरे नेतात. मात्र, तेथे डॉक्टर नसल्याने पशुधनमालकाला परतावे लागते. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना बोगस डॉक्टराकडून जनावरांवर उपचार करून घ्यावे लागत आहे. तालुका प्रशासनाने या परिसरातील बोगस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गोपालकांनी केली आहे. (वार्ताहर)
पशुसेवक बनले बोगस डॉक्टर
प्रत्येक पशु दवाखान्यात पुशसेवक असतात. हे सेवक स्वत:ला डॉक्टर समजून जनावरांची तपासणी करून औषधोपचार करीत आहेत. यांच्या चुकीच्या उपचाराने अनेक जनावरे दगावले आहेत. मात्र शासकीय यंत्रणा कारवाई करण्यास धजावत नाही.
जनावरांना रोगाची लागण
पालोरा परिसरात अनेक गावातील पशुंना विविध रोगांची लागण झाली आहे. यात तोंडखुरी, पायखुरीने जनावरे त्रस्त झाली आहेत. मात्र येथील डॉक्टरांचे दुर्लक्ष झाले आहे. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत लसीकरण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे. शासकीय दवान्यातील डॉक्टर खासगी व्यवसाय करण्यात गुंग आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावर नियंत्रण आणता यावे, यासाठी शिबिर लावण्याची गरज आहे.