कोंढा येथे जनावर बाजार बंद, पण गर्दी कमी होण्याचे नाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST2021-03-27T04:36:54+5:302021-03-27T04:36:54+5:30

कोंढा-कोसरा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोंढा येथील जनावरांचा बाजार बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याने नागपूर व इतर ठिकाणाहून ...

The livestock market at Kondha is closed, but the crowds have not abated | कोंढा येथे जनावर बाजार बंद, पण गर्दी कमी होण्याचे नाव नाही

कोंढा येथे जनावर बाजार बंद, पण गर्दी कमी होण्याचे नाव नाही

कोंढा-कोसरा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोंढा येथील जनावरांचा बाजार बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याने नागपूर व इतर ठिकाणाहून येणारे व्यापारी, जनावरे खरेदीसाठी येणाऱ्यांचे येणे-जाणे बंद झाले आहे.

कोंढा येथील जनावरांचा बाजार विदर्भात प्रसिद्ध आहे. या बाजारात गाय, म्हैस, शेळी यांची खरेदी-विक्री होते. यासाठी खूप दूरवरून लोक खरेदी करणासाठी येतात. सध्या कोरोना महामारी वाढत आहे, नागपूर येथे याचे प्रमाण अधिक आहे तसेच इतर जिल्ह्यांतही रुग्ण वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग कोंढा व परिसरातील लोकांना होऊ नये, यासाठी काेंढा ग्रामपंचायतीने हा बाजार बंद करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे.

कोंढा बाजारात नागपूर येथील व्यापारी खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. भंडारा जिल्हाधिकारी यांनी व्यापारी, दुकानदार, बँक, पतसंस्था अभिकर्ता, कर्मचारी या सर्वांनी कोरोना चाचणी करण्याविषयी पत्र काढले होते. पण अनेक गावांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही.

कोंढा येथेही अनेक दुकानदार, कर्मचारी यांनी कोरोना चाचणी केली नसल्याने महामारीचा प्रभाव परिसरात वाढू शकतो. तसेच कोंढा येथे बँक ऑफ इंडियाची शाखा आहे, येथे परिसरातील २५ गावांमधील लोक पैसे काढणे, भरणे यासाठी येतात. त्यामुळे बॅंकेत मोठी गर्दी असते. यावेळी शारीरिक अंतर पाळले जात नाही, लोक गर्दी करून उभे असतात. त्यामुळे कोरोना परिसरात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्यावरही अनेक तरुण तसेच दुकानात खरेदी करण्यासाठी येणारे विनामास्क येतात. त्यामुळे ग्रामपंचायत, कोंढा व कोसराने कर्मचाऱ्यांचे एक पथक बनवून विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. याकडे दोन्ही ग्रामपंचायतींनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Web Title: The livestock market at Kondha is closed, but the crowds have not abated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.