किडणी दान देऊन पतीला जीवनदान
By Admin | Updated: June 22, 2015 00:24 IST2015-06-22T00:24:05+5:302015-06-22T00:24:05+5:30
पती-पत्नी हे संसाररथाची दोन चाके. त्यापैकी एक चाक विचलीत झाले तरी संसाराचा गाडा कोलमडतो.

किडणी दान देऊन पतीला जीवनदान
उमरी येथील दाम्पत्य : पत्नीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
माणिक खर्डेकर सासरा
पती-पत्नी हे संसाररथाची दोन चाके. त्यापैकी एक चाक विचलीत झाले तरी संसाराचा गाडा कोलमडतो. सावित्री व सत्यवानाचा आदर्श ठेवून साकोली तालुक्यातील उमरी येथील छाया कापगते या महिलेने पती हेमराज धोंडूजी कापगते यांना किडणी (मूत्रपिंड) दान करून जीवनदान दिले.
उमरी येथील रहिवाशी हेमराज कापगते हे आसोली येथील सुदामा माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. मूत्रपिंडाच्या आजाराने त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. बराच औषधोपचार करूनही आजारातून बरे होण्याची चिन्ह दिसत नव्हती. शस्त्रक्रिया करून किडणी प्रत्यारोपण करणे हाच एकमेव मार्ग उरला होता.
नागपूर येथील आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले. कोणीतरी किडणी दाता मिळेल यासाठी कापगते कुटुंबीयांची धावपळ सुरु होती. परंतु कुणी दाता मिळाला नाही. वेळ निघून जात होती. पतीची जीवघेणी व्यथा त्यांची पत्नी छाया यांना असह्य होत होती. या दांपत्याला एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलांच्या भवितव्याच्या विचाराने छाया सुन्न झाली. छायाने प्राप्त परिस्थितीचा विचार करून स्वत:ची एक किडणी दान करण्याचा प्रस्ताव डॉक्टरांसमोर ठेवला. या प्रस्तावानंतर तिचे आईवडील व भाऊ काही वेळ स्तब्ध झाले. परिस्थितीवर मात करण्यासाठी छायाने घेतलेला निर्णय उचित असल्याची खात्री सर्वांना पटली. त्यानंतर किडणी प्रत्यारोपणासाठी कागदपत्रांचे सोपस्कार पार पाडण्यात आले. त्यानंतर छायाने किडणी दान करून पतीला जीवदान दिले. सध्या हेमराज व छाया या दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. पत्नीने पतीला जीवदान देऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. छायाच्या या दातृत्त्वशक्तीचे कौतुक होत आहे.