संगम येथे विजेचा लपंडाव
By Admin | Updated: March 22, 2015 01:39 IST2015-03-22T01:39:36+5:302015-03-22T01:39:36+5:30
संगम पुनर्वसन हे प्रकल्पबाधित गाव असून या गावचे मुजबी येथे पुनर्वसन झाले. मात्र हा गाव अनेक समस्याच्या विळख्यात अडकला असून मूलभूत सुविधापासून वंचित आहे.

संगम येथे विजेचा लपंडाव
भंडारा : संगम पुनर्वसन हे प्रकल्पबाधित गाव असून या गावचे मुजबी येथे पुनर्वसन झाले. मात्र हा गाव अनेक समस्याच्या विळख्यात अडकला असून मूलभूत सुविधापासून वंचित आहे. संगम येथील पथदिवे मागील दहा दिवसांपासून बंद आहेत. याबाबत सलग तीन दिवसापासून विद्युत वितरण कंपनी शहापूर सर्कलच्या तक्रार रजिस्टरमध्ये नोंद केली. मात्र अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
संगम येथील संपूर्ण विद्युत यंत्रणा खिळखिळी झाली असून विद्युत तारा जमिनीच्या दिशेने लोंबकळल्या आहेत. उभे असलेले खांब लोकांच्या घरावर झुकले आहेत. त्यामुळे मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. रोहित्र खुले असून पूर्णत: तुटलेले आहे.
वारंवार विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन विद्युत तारातून जिवंत ठिणग्या पडतात. जिवंत विद्युत तारा जमिनीच्या दिशेने झुकल्यामुळे व विद्युत खांब आडवे झोपल्यामुळे वारंवार येथील विद्युत खंडीत होत असते. विद्युत कंपनी शहापूरचे कर्मचारी थातुरमातूर जोडजंतर करून तात्पुरती विज सुरू करतात. मात्र पुन्हा दोन दिवसानी विद्युत बंद होते. येथील पथदिवे तर नेहमी बंदच असतात.
महावितरण कंपनीच्या वतीने प्रत्येक परिसरात एका जनमित्राची नियुक्ती केली जाते. त्या व्यक्तीकडे सदर परिसरातील विजेची संपूर्ण जबाबदारी असते.
संगम पूनर्वसन मुजबी व शहापूर सर्कलमध्ये येत असूनही या सर्कलच्या कर्मचारी अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे संगम येथील विज नेहमी बंद असते. येथील वाकलेली विद्युत खांब व झुकलेली विद्युत तारा यांची पूर्ण बांधणी करण्याची गरज असतानाही येथील कर्मचारी हेतूपुरस्पर दुर्लक्ष करून चाल ढकलपणा करीत आहेत. मात्र यांच्या वेळकाढू धोरणामुळे संगम येथील नागरिकांचे जीव धोक्यात आहे. कारण येणाऱ्या वादळ, वाऱ्यामुळे येथील वाकलेले खांब व जिवंत विद्युत तारांतून उडणाऱ्या ठिणग्यामुळे मोठा घातपात होऊ शकतो.
संगम हे गाव प्रकल्पबाधीत गाव असल्यामुळे या गावाकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी गावकऱ्यांची प्रशासनाप्रती नाराजी असून जीव गेल्यावरच विद्युत यंत्रणा सुरळीत होईल. तेव्हापर्यंत पथदिव्याखाली अंधार असल्याची खंत गावकरी सांगतात. (नगर प्रतिनिधी)