‘त्या’ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
By Admin | Updated: December 20, 2015 00:23 IST2015-12-20T00:23:13+5:302015-12-20T00:23:13+5:30
मोहाडी तालुक्यातील जांब येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय जांब येथील वर्ग खोल्यावरचे कवेलू फुटले असल्याने ...

‘त्या’ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
बसण्याची अपुरी व्यवस्था : शिक्षण विभागाचा दुर्लक्ष असल्याचा पालकांचा आरोप
रमेश लेदे जांब (लोहारा)
मोहाडी तालुक्यातील जांब येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय जांब येथील वर्ग खोल्यावरचे कवेलू फुटले असल्याने पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना या खोल्यात बसून विद्यार्जन करणे धोकादायक झाले आहे. उर्वरित कवेलू कोसळून जनहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनपर्यंत त्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये व पालकवर्गामध्ये असंतोष पसरला आहे. जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय जांब येथील वर्ग ५ ते ८ पर्यंतचे विद्यार्थी बसत असलेल्या वर्ग खोल्यांचे कवेलू, तोडफोड झाली आहेत. कवेलू फुटले असल्याने पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी पडते. त्यामुळे त्या खोल्यामध्ये विद्यार्थ्यांना बसविणे बंद केले आहे व वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळपाळीची शाळा ठेवण्यात येत असल्याने सकाळी तीन तासामध्ये विद्यार्थी किती अभ्यास करणार हा प्रश्न पालकवर्गामध्ये भेडसावत असून सकाळपाळीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालकवर्गानी केली आहे. शैक्षणिक सत्र सुरु होऊन कितीतरी महिने झाले. परंतु अजूनपर्यंत त्या वर्गखोल्यांची कवेलू दुरुस्ती करण्यात आली नसून याकडे शिक्षण विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष असल्याची ओरड पालकवर्गामध्ये आहे. तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून जांब येथील वर्ग खोल्या त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी आहे.