पतिवियोगात पत्नीनेही संपविली जीवनयात्रा
By Admin | Updated: September 2, 2015 00:20 IST2015-09-02T00:20:53+5:302015-09-02T00:20:53+5:30
तालुक्यातील सामेवाडा येथील एका नवविवाहितेची आत्महत्येची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे

पतिवियोगात पत्नीनेही संपविली जीवनयात्रा
समाजमन गहिवरले : सामेवाडा येथील घटना
लाखनी : तालुक्यातील सामेवाडा येथील एका नवविवाहितेची आत्महत्येची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. पतिनिधनानंतर जगायचे कोणासाठी व कसे हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रेमविवाहामुळे माहेरची नाड तुटल्यामुळे त्या तरुणीने कीटकनाशक प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.
सामेवाडा येथील २४ वर्षीय प्रमोद सहादेव भांडारकर याने डिसेंबर २०१४ मध्ये लाखोरी येथील नीतू भदाडे या २० वर्षीय तरुणीसोबत साकोली येथील लहरीबाबा मठात विवाह केला होता. त्यानंतर विवाहाला कायदेशीरपणा प्राप्त व्हावा यासाठी वकिलामार्फत नोटरी केली. नीतू ही प्रमोदच्या चुलत मामाची मुलगी आहे. दोघांच्या प्रेमाचे रुपांतर विवाहात झाले होते.
प्रमोदच्या वडिलांकडे अर्धा एकर शेती आहे. प्रमोद मजुरी करुन पोट भरायचा. सुखाचा संसार सुरु असतानाच नियतीने घात केला. २० आॅगस्टला प्रमोदचा काविळने मृत्यू झाला. दु:खाची कुऱ्हाड नीतूवर कोसळली. नीतू तीन महिन्यांची गर्भवती होती. अशातच प्रमोदचे जाने नीतूला चटका लावून गेले. प्रमोद नीतूच्या विवाहाला विरोध होता. प्रमोदच्या अंतयात्रेला ते आले नाही. पतिवियोगाचे दु:ख नीतू पेलू शकले नाही. सरती शेवटी नीतूनेही विषारी कीटकनाशक प्राशन करुन जगाचा निरोप घेतला. सात जन्माच्या आणाभाका घेतलेल्या पत्नीने पतीच्या पाठोपाठ जाणे पसंत केले. विषारी द्रव्य घेतल्याचे लक्षात येताच तिला लाखनीत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. प्रेमाच्या आणाभाका करणाऱ्यांच्या आयुष्याचा असा शेवट झाल्याने समाजमन हळहळत आहे. (तालुका प्रतिनिधी)