शिक्षकाने केली रद्दीतून ग्रंथालय निर्मिती
By Admin | Updated: May 21, 2016 00:33 IST2016-05-21T00:33:59+5:302016-05-21T00:33:59+5:30
आपल्या अवतीभवती बरेच व्यक्ती छंद जोपासतात, वाचनाचा छंद तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी महत्वाचा व आवश्यक ठरणारा छंद आहे.

शिक्षकाने केली रद्दीतून ग्रंथालय निर्मिती
लोकमतचा संग्रह : अभिनव कल्पना विद्यार्थ्यांसाठी ठरली प्रेरणादायी
गिरीधर चारमोडे मासळ
आपल्या अवतीभवती बरेच व्यक्ती छंद जोपासतात, वाचनाचा छंद तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी महत्वाचा व आवश्यक ठरणारा छंद आहे. खर पाहिलं तर छंद म्हणजे सतत जोपासली जाणारी आवड असते. ज्यामुळे रिकामा वेळ सत्कारणी लागतो व व्यक्तिंच्या सर्जनशीलतेमध्ये वाढ होत जाते.
अशाच प्रकारे वाचनाच्या छंदातून आगळा वेगळा छंद जडलाय प्रशांत प्राथमिक शाळा मासळ येथील शिक्षक, तसेच दिशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय मासळचे संचालक निश्चय बळीराम दोनाडकर यांना. अगदी लहानपणापासूनच विविध वृत्तपत्रामधील आवश्यक अशा महत्वाच्या वेगवेगळ्या विषयावरच्या बाबींची कात्रणे काढायची सवय जडली. कात्रणांची त्यांनी वेगवेगळी बरीचसी संकलीत पुस्तक तयार केले आहेत. त्यांच्या या संकलित ग्रंथालयात सन २००३ पासूनच्या लोकमतच्या सखी, मंथन, आॅक्सिजन, शालेय परिपाठ, आरोग्य, विज्ञान, कला, क्रीडा, थोर शास्त्रज्ञ, आदर्श व्यक्ती अशा प्रकारच्या विविध विषयावरची पुस्तके तयार करुन ग्रंथालयात संग्रहीत केलेली आहेत.
त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता संस्थेने तयार केलेल्या इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट अंतर्गत यावर्षी त्यांनी विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी संकलित केलेल्या लोकमत वृत्तपत्राच्या सदरातील जंगलबुक, आशियन बुक, स्पोर्टबुक, निसर्गसफारी, ऊर्जा, आशा विविध विषयावरचे पुस्तक विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करुन विद्यार्थ्यांना रद्दीतून ही ग्रंथालय निर्मिती कशी करायची याचे मार्गदर्शन केले. पुस्तक तयार करीत असतांना साध्या कोऱ्या कागदावर कात्रणे संकलित करुन प्रत्येक पुस्तकाच्या आरंभी अनुक्रमाणिका दिली.
त्यामुळे विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती पटकन शोधता येते. या उपक्रमात विद्यार्थी सुध्दा स्वयंप्रेरणेने सहभागी होतो व त्यातून त्यांना वेगवेगळ्या विषयाची वाचन करण्याची आवड निर्माण होते.
अश पध्दतीचा हा छंद कमी खर्चात, रद्दीच्या माध्ममातून ग्रंथालय निर्मिती करणे हे कोणत्याही व्यक्तिला वा विद्यार्थ्यांना सहज शक्य आहे. अशाप्रकारे संकलित ग्रंथालय हे स्वत:साठी व इतरांच्या समस्या सोडविण्यासाठी व मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरते असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
विविध विषयावरची महत्वाची माहिती लोकमत आपल्या वृत्तपत्रात नियमितपणे प्रकाशित करीत असल्याने विद्यार्थ्यांकरिता संस्काराचे मोती स्पर्धा मोलाची ठरत आहे. त्यासाठी संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांनी लोकमतचे आभार मानले तसेच इतर शाळांमधील शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्रंथालयाची निर्मिती करावी, असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यांचा छंद विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याच्या कामी येत आहे.