बंधारा बांधू द्या, त्यानंतर फोडा! अधिकाऱ्याचे सुतोवाच
By Admin | Updated: February 15, 2015 00:32 IST2015-02-15T00:32:44+5:302015-02-15T00:32:44+5:30
साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर बांधण्यात येत असलेला बंधारा हा 'हरितक्रांती' कार्यक्रमाला फार्स ठरणारा आहे.

बंधारा बांधू द्या, त्यानंतर फोडा! अधिकाऱ्याचे सुतोवाच
भंडारा : साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर बांधण्यात येत असलेला बंधारा हा 'हरितक्रांती' कार्यक्रमाला फार्स ठरणारा आहे. येथील शेती बुडीत क्षेत्रात येत असतानाही तिथे लघु पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्याचे बांधकाम होत आहे. याला शेतकऱ्यांनी विरोध केला असता, उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनाच पैसे घेऊन गप्प रहा, नाही तर बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यावर त्याला फोडा. असे सुतोवाच केल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ बंधाऱ्याबाबत कैफियत मांडली.
शासनाने शेतीला मुबलक पाणी मिळावे, यासाठी सर्वत्र बंधारे बांधकाम करण्यावर भर दिला आहे. याच अनुशंगाने, जिल्ह्यातील शेतींना सिंचनाची व्यवस्था व्हावी, यासाठी धरण व बंधाऱ्यांचे कामे करण्यात येत आहे. मार्च एंडिंग असल्याने आता प्रत्येक विभागातील शिल्लक निधी परत जाण्याची भीती असल्याने विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी निधीच्या उपयोगातून कामावर खर्च करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बंधारा बांधकाम करण्यात येत आहे. बांधकामाचा करार ग्रामपंचायतीच्या नावाने असला तरी हे काम कंत्राटदाराकडून करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे.
या क्षेत्रातील शेती नाल्याच्या पाण्यामुळे अगोदरच बुडीत क्षेत्रात येते. शेती बुडीत प्रकरणाचे शेतकऱ्यांना पैसेही मिळालेले आहे. असे असताना बांधण्यात येत असलेला बंधाऱ्याचे काम चुकीचे असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी बांधकामाला विरोध केला. बांधकाम करण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच काम करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी कामाला विरोध केला असतानाही जेसीबीच्या माध्यमातून नाल्याचे सपाटीकरण करून पाण्याला थोप बसावी, यासाठी मातीकाम करण्यात आले. याबाबत लघु पाटबंधाारे विभागाचे साकोली उपविभागाचे अभियंता धुर्वे यांनी शेतकऱ्यांना आधी बंधारा बांधू द्या, कंत्राटदाराचे पैसे निघाल्यावर तोडून टाका, असा सल्ला दिल्याचा उदय जगदीश बोरकर या शेतकऱ्याने ‘लोकमत’जवळ सांगितले. या बंधाऱ्यामुळे शासकीय पैशाचा दुरूपयोग होत असून हे काम त्वरीत थांबवावे, अशी मागणी दयाराम रूरखमोडे, हरिदास रूखमोडे, केवळराम रूखमोडे, उदय बोरकर, हरीभाऊ रूखमोडे, जागेश्वर रूखमोडे आदी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)